औरंगाबाद : बँकेतून पैसे काढून एसटी बसने औरंगाबादला आलेल्या मका व्यापाऱ्याची पिशवी कापून चोरट्यांनी दीड लाख रुपये लंपास केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्याने छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
एएस क्लब जवळील तापडिया इस्टेट येथील रो हाउसमध्ये राहणारे राजकुमार हंसराज गंगवाल (६५)हे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.१४ डिसेंबर रोजी दुपारी त्यांनी देवगाव रंगारी येथील बँक ऑफ महाराष्ट्र मधून ४ लाख ५० हजार रुपये काढले. ही रक्कम कापडी पिशवीत ठेवून ते एसटी बसने औरंगाबादला आले. नगर नाका येथे बसमधून उतरून रिक्षाने घरी गेले. तेव्हा रिक्षाचालकाला पैसे देण्यासाठी त्यांनी पिशवीत हात घातला असता त्यांना त्यांची पिशवी कापलेली दिसली.
यानंतर त्यांनी घरी जाऊन पिशवीतील पैसे मोजले असता त्यात ३ लाख रुपयेच असल्याचे त्यांना दिसले. उर्वरित दिड लाख रुपये पिशवी कापून चोरट्यानी पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी रात्री ७ वाजता छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रात नोंदविली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, बस प्रवासादरम्यान तीन अनोळखी तरुण त्यांच्या शेजारी उभे होते. त्यांनीच ही रक्कम पळविली अथवा रिक्षा प्रवासात अन्य कोणी हे समजू शकले नाही. पोलिश हवालदार दिलीप जाधव तपास करीत आहेत.