औरंगाबाद, दि. २८ : गंगापूर येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यानी जवळपास ३ लाख ५० हजाराच्या ३ मुर्त्यांची चोरी केली. तिन्ही मुर्त्या भगवान महावीर यांच्या असून पंचधातुंच्या होत्या. यासोबतच इतर ३ दुकानेही फोडत त्यांनी हजारो रुपयाचा गल्ला चोरट्यानी लुटला. हि घटना रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि, मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरास रात्री कुलूप असते. हीच संधी साधून चोरांनी रविवारी रात्री २ च्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते कुलूप अत्याधुनिक तंत्राचे असल्याने तुटले नाही. यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या डाव्या बाजूस असलेला दरवाजा तोडला व आता प्रवेश केला. प्रवेश करताच समोरच दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. ती तोडून त्यातील जवळपास 70 हजार रुपये त्यांनी ताब्यात घेतले. यानंतर आत मोठ्या मूर्ती समोरील भगवान महाविराच्या ३ पंचधातूच्या मुर्त्यांची त्यांनी चोरी केली. यातील एक मूर्ती 9 किलो 800 ग्राम तर एक मूर्ती 6 किलो ग्राम वजनाची आहे. या तिन्ही मुर्त्यांची बाजार भावाप्रमाणे किंमत जवळपास ३ लाख ५० हजार रुपये आहे.
आणखी ३ दुकाने फोडली तेथून बाहेर निघून चोरट्यांनी जवळपास 2.32 मिनिटांनी रस्त्यातील ३ दुकानाचे शटर तोडले. यातूनही गल्ल्यातील हजारो रुपये त्यांनी लुटले. यावेळी हा सारा प्रकार रस्त्यावरील एका दुकानच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
सीसीटीव्हीची दिशा होती वळवलेली रस्त्यामधील दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये रात्री २ वाजता एका बाईकवर ३ जण मंदिराच्या दिशेन जात असलेले दिसते. विशेष् म्हणजे चोरी झालेले मंदिर व दुकाने या ठिकाणची सीसीटीव्ही कालपासूनच बंद होती. तसेच मंदिर व चोरी झालेली तिन्ही दुकानाच्या जवळील सीसीटीव्हीची दिशा आदल्या दिवशीच वळवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. चोरीची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठसेतज्ञ व श्वान पथकाच्या सह्हायाने पुढील तपास करत आहेत.