औरंगाबाद : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमधील टेक्निकल डिफाॅल्टचा फायदा घेत आयडीएफसी या र्व्हच्युअल बँकेच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढणारी हरियाणातील टोळी औरंगाबाद सायबर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी केला होता. औरंगाबाद शहरातील विविध एटीएममधून तब्बल १३ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम या टोळीने काढली असल्याची माहिती समोर आली आहे.
मोबाइलच्या माध्यमातून बँकेचा पासवर्ड, खाते क्रमांक विचारून, ॲप डाऊनलोड करण्यास सांगून खातेधारकांना गंडा घातल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र, थेट ग्राहकांना न फसवता बँकांनाच गंडा घालणारी हरियाणातील टोळी औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आली आहे. या टोळीने शहरातील एसबीआय बँकेच्या विविध एटीएममधून तब्बल १३ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद सायबर पोलिसांच्या पथकाने नागपूरहून इक्बाल खान, अनिस खान आणि मोहम्मद तालीब (सर्व रा. पलवल-मेवत, जि. नूह, हरियाणा) या आरोपींना औरंगाबादेत आणले आहे. हे आरोपी एसबीआयच्या एटीएम मशीनमधील टेक्निकल डिफाॅल्टचा फायदा घेऊन आयडीएफसी या र्व्हच्युअल बँकेच्या एटीएममधून पैसे काढत होते. एटीएममधून पैसे गेल्यानंतर त्याची नोंद संबंधित बँकेत किंवा खातेधारकाच्या अकाउंटमध्ये होत नव्हती. सायबर पोलिसांच्या तपासात यातील त्रूटी निष्पन्न झाल्या आहेत.
पलवल- मेवत गावातील मुख्य आरोपी सलीम हा या टोळीचा म्होरक्या आहे. या म्होरक्याला एटीएम मशीन बनविणाऱ्या कंपनीच्या ओक्की नावाच्या ब्रँडमधील त्रुटी माहिती होत्या. या त्रुटीचा फायदा घेत तो एसबीआय बँकेच्या देशभरातील एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम काढीत होता. औरंगाबादेतील विविध एटीएममधून १३ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींपैकी इक्बाल याचा औरंगाबादेतील गुन्ह्यातील सहभाग उघड झाला आहे. इतर दोघा जणांची चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय पलवल-मेवत गावातील इतर चार जणही या कटात सहभागी आहेत. त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ही कारवाई सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक राहुल चव्हाण आदींच्या पथकाने केली आहे.
रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमाआयडीएफसी या र्व्हच्युअल बँकेच्या एटीएमद्वारे चोरटे एसबीआयच्या एटीएम मशीनमधील टेक्निकल डिफाॅल्टचा फायदा घेत होते. एटीएमचा पासवर्ड टाकून पैसे काढत. एटीएममधून पैशाचा काही भाग बाहेर येताच चोरटे तो पकडून ठेवत, अर्धा मिनिटानंतर एटीएम मशीनमध्ये असलेल्या कमांडनुसार हे पैसे परत जात होते. मात्र, प्रत्यक्षात हे पैसे चोरट्याच्या हाती पडत. त्याचवेळी चोरट्यांचे ट्रान्झेक्शन पूर्ण झाले नसल्यामुळे डेबिट झालेले पैसे पुन्हा त्यांच्या खात्यात बँक क्रेडिट करीत होती.
चोरीनंतर मौजमजानागपूर पोलिसांनी पकडलेल्या या चोरट्यांच्या टोळीने देशभरातील नागपूर, मुंबई, सोलापूर, नाशिक, भुवनेश्वर, कटक, मिदनापूर, कोलकाता, कर्नाटक, बिदर, आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम आदी शहरांमधून या प्रकारे एटीएममधून पैसे काढले आहेत. शहरे फिरण्यासाठी या चोरट्यांनी क्रेटा कार विकत घेतली होती. पाच-दहा लाख रुपये जमा झाले की, चोरटे गोवा, मुंबईत जाऊन मौजमजा करीत असल्याची कबुलीही आरोपींनी नागपूर पोलिसांकडे दिलेली आहे.