औरंगाबाद : जेलमधून सुटल्यानंतर दुचाकी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला त्याच्या साथीदारासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांनी शहरात तीन ठिकाणांहून आणि अंबड येथून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई शिवाजीनगर ते नेहरू कॉलेज रस्त्यावर करण्यात आली. सोनाजी क्षीरसागर (२७, रा. अंबड) आणि अजय नारायण व्यवहारे (२७, रा. सिडको एन-३) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय पवार आणि कर्मचारी बुधवारी गस्तीवर असताना गारखेडा परिसरातील भारतनगर येथे दोन जण स्वस्तात दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. त्यानंतर पवार यांनी लगेच नेहरू कॉलेज रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी दोन वेगवेगळ्या दुचाकीवरुन संशयित चोरटे आले. चोहोबाजूने घेरून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यानंतर त्याच्याकडील वाहनांच्या कागदपत्रांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही.
त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत नेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत त्यांच्याकडील मोटारसायकली चोरीच्या असल्याचे सांगितले. त्यांनी जवाहरनगर, सिडको आणि एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन आणि अंबड येथून एक दुचाकी चोरली. या दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. यातील एका दुचाकीचे पेट्रोल संपल्यामुळे त्यांनी ती शहरातील एका ठिकाणी लपवून ठेवली होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवार, पोहेकॉ मच्छिंद्र ससाणे, किरण गावंडे, गोविंद पचरंडे, विजय पिंपळे, रमेश सातपुते, चंद्रकांत सानप, दत्ता ढंगारे आणि चालक पवार यांनी केली.
आरोपी सोनाजी क्षीरसागर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा आहे. तो वाहनचोरीच्या गुन्ह्यात जालना येथील कारागृहात कैद होता. तो नुकताच कारागृहातून बाहेर आला आणि त्याने औरंगाबादेत येऊन वाहनचोऱ्या करण्यास सुरुवात केली. अटकेनंतर त्याने चार दुचाकी चोरी केल्याचे सांगितले असले तरी, त्याच्याकडून वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येईल,अशी शक्यता पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी व्यक्त केली.