औरंगाबाद : महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जात नसल्याच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सोमवारपासून बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये मराठवाड्यातील विविध गावांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. पीककर्ज दिल्याशिवाय बँकेसमोरून हटणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे. भाकपचे नेते राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर पोहोचले. त्यानंतर या शेतकऱ्यांनी बँकेच्या दारातच ठिय्या दिला. यातील काही शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सुमारे २६७ शाखा आहेत. या बँकेकडे सुमारे तीन हजार गावे दत्तक आहेत. रिझर्व्ह बँक आणि नाबार्डनेही विशेष परिपत्रक जारी करून शेतकऱ्यांना पीककर्ज पुनर्गठण करून नवीन कर्ज देण्याची तरतूद अमलात आणण्याचा आदेश दिला आहे. तरीही महाराष्ट्र बँकेकडून कर्ज पुनर्गठण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. अनावश्यक कागदपत्र सांगणे, दिशाभूल करणारी माहिती देणे असे प्रकारही सुरू आहेत. पीककर्ज मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिकाही या आंदोलकांनी घेतली आहे. या आंदोलनात राजू पाटील, कैलास कांबळे, सुरेश ठवणे, तुकाराम शिंदे, मितेश सुक्रे, कैलास पारवे, देवीदास जिगे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत.
शेतकऱ्यांचा बँकेसमोर ठिय्या
By admin | Published: May 31, 2016 12:13 AM