निखिल गुप्ता : इतर ग्रामपंचायतींनीही हा उपक्रम राबविण्याची गरज
वाळूज महानगर : वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात विविध ठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून, याचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता व आ. संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले.
वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ६ लाख रुपये खर्च करून गावात विविध ठिकाणी ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. उद्घाटनप्रसंगी प्रशासक दीपक बागुल, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई, माजी सरपंच सचिन गरड, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोनि. प्रशांत पोतदार आदींची उपस्थिती होती.
आ. संजय शिरसाट म्हणाले, काही दिवसांपासून वडगावात गंभीर गुन्ह्याच्या घटना वाढत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा चांगला निर्णय घेतला. यामुळे गुन्हेगारी कारवायांना पायबंद बसणार असून, गाव दत्तक योजना राबविण्यासाठी पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधींबरोबर गावातील नागरिकांनी सहभाग घेतल्यास गावात पूर्वीप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सीसीटीव्ही बसविण्याच्या निर्णयाचे कौतुक करून हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींनी राबविण्याची गरज असल्याचे सांंगितले. गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींची मदतही घेतली जाणार आहे. तसेच वडगाव कोल्हाटीची बंद पडलेली गाव दत्तक योजना राबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले.
प्रास्ताविक दत्तात्रय वर्पे, सूत्रसंचालन सचिन गरड तर आभार हनुमान भोंडवे यांनी मानले. कार्यक्रमाला शिवसेना पश्चिम तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, बाळासाहेब गायकवाड, माजी उपसरपंच सुनील काळे, बप्पा दळवी, श्रीकृष्ण भोळे, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, श्रीकांत साळे आदी उपस्थित होते. यानंतर पोलीस आयुक्त गुप्ता यांनी गाव दत्तक योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या मैदानाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
फोटो ओळ
वडगाव ग्रामपंचायतीने बसविलेल्या सीसीटीव्ही उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, आ. संजय शिरसाट, सचिन गरड आदी.