‘एमआयएम’ने मराठवाड्यात सर्व प्रथम नांदेड येथे एन्ट्री मारली. नांदेड मनपा निवडणुकीत २०११ मध्ये ‘एमआयएम’चे तब्बल ११ नगरसेवक निवडून आले. मात्र, २०१६ च्या मनपा निवडणुकीत या पक्षाचा सफाया झाला. तशीच प्रचिती आता औरंगाबादेत येत आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिकेचा कार्यकाळ संपला. मागील दोन वर्षांपासून मनपात प्रशासकीय राजवट आहे. महापालिका निवडणुका कधी होतील हे सुद्धा निश्चित नाही. त्यापूर्वी ‘एमआयएम’ला चांगलीच गळती लागली आहे. सर्वात अगोदर आसेफिया कॉलनी येथील सय्यद मतीन, बायजीपुरा भागातील शेख जफर यांनी ‘एमआयएम’मधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. गुरूवारी रोशनगेट भागातून ‘एमआयएम’च्या तिकिटावर निवडून आलेल्या साजेदा सईद फारूकी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अभिषेक देशमुख, शेरखान, शिवाजीराव गर्जे यांची उपस्थिती हाेती. आता या पक्षाच्या माजी नगरसेवकांची संख्या २४ वरून थेट २१ वर गेली असून आणखी काही माजी नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाच अपक्ष माजी नगरसेवक राष्ट्रवादीत
ज्योती अभंग, सुनीता चव्हाण, विजया बनकर, राहुल सोनवणे, आशा निकाळजे या पाच माजी नगरसेवकांनी यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीपूर्वी चांगलेच बळ मिळाले आहे.