- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांत निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. अशातच नीती आयोगाने येत्या सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. डेल्टा प्लसनेही चिंता वाढवली असून, आरोग्य विभागाकडून संभाव्य तिसरी लाट थोपविण्याची तयारी केली जात आहे. तिसऱ्या लाटेत राज्यात तब्बल १२ लाख ९५ हजार रुग्ण ॲक्टिव्ह राहण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा उपचारासाठी सज्ज होत आहे.
राज्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाचा एकच कहर पहायला मिळाला. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आणि मृत्यूचेही प्रमाण वाढले. दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेची ऑक्सिजनपासून इतर उपचार सुविधांच्या बाबतीत कसोटीच लागली. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आतापासूनच खबरदारीची पावले टाकत आहे. दुसऱ्या लाटेत जेवढे रुग्ण आढळले, त्याच्या दीडपट बाधित रुग्ण तिसऱ्या लाटेत आढळण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविली जात आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत उपचार सुविधा उभ्या करण्यात येत आहेत.
कोकण विभागात सर्वाधिक रुग्णराज्यात कोकण विभागात सर्वाधिक रुग्ण सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत मिळून एकूण तीन लाख ४३ हजार २२७ रुग्ण सक्रिय राहण्याची भीती आहे.
औरंगाबादेतील स्थितीऔरंगाबाद जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत ३१ हजार ९२३ रुग्ण ॲक्टिव्ह राहण्याचा अंदाज आहे. तिसरी लाट आली तर रोज ४६ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा असणे अपेक्षित आहे. घाटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, महापालिका आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहेत. त्यादृष्टीने ऑक्सिजन सुविधेत वाढ करण्यासह उपचार सुविधाही सज्ज केली जात आहे.
लक्षणांत सतत बदलकोरोनाचे स्वरूप बदलत गेले तसे रुग्णांच्या लक्षणांतही बदल होत गेला. आधी सर्दी, खोकला, पडसे ही लक्षणे मानली जात होती. त्यानंतर तोंडाची चव जाणे व वास न येणे, जुलाब असे लक्षणे समोर आली. आता अंगदुखी, सांधेदुखी ही लक्षणे मानली जात आहेत. कोरोनाचे स्वरूप बदलत असले तरी निदान आणि उपचार तेच आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नये, असे औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर म्हणाल्या.
कोरोना प्रतिबंधक नियम पाळादुसरी लाट संपली आणि कोरोना गेला हे मनातून काढून टाकले पाहिजे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. सोशल डिस्टन्ससह कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले पाहिजे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी.- डाॅ. स्वप्निल लाळे, आरोग्य उपसंचालक
असे राहतील तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्ण :विभाग---रुग्णसंख्या-कोकण- ३,४३,२२७-पुणे- ३,२०,६९३- नाशिक- १,६९,३६४-औरंगाबाद- १,६६,७००-अमरावती- ७३,५१७- नागपूर- २,२१,७१२