मराठवाड्याच्या ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसत असून, १५ लाख ग्रामस्थांची तहान १७५८ टँकरने भागवली जात आहे. टँकरच्या मंजुरीचा सपाटा मागील दीड महिन्यात सुरूच आहे. मेच्या प्रारंभी विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १२ लाख ग्रामस्थांना टँकरचा पाणीपुरवठा सुरू होता. १५ दिवसांत ३३४ टँकर वाढले आहेत, तर तीन लाख ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. टँकर वेळेत गेले नाहीत, तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत आहे.
सध्या ११९३ गावे आणि ४५५ वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. १५ दिवसांत २३२ गावे, ११० वाड्या, ६५१ विहिरींचे अधिग्रहण वाढले. तीन लाख नागरिक दुष्काळाच्या रेट्याखाली आले. ३३४ टँकरची संख्या वाढली. विभागातील जलसाठे आटू लागले आहेत. मोठे ११, मध्यम ७५, लघु ७४९, बंधारे ४२ मिळून ८७७ प्रकल्पांत सद्य:स्थितीत सुमारे १०.३३ टक्के पाणी आहे. अनेक मध्यम व लघुप्रकल्प आटले आहेत.
जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १०९, तर जालना जिल्ह्यात ७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या ३१९ वर पोहोचली. मार्च ४३५, एप्रिल १४२४ व मे महिन्यात १७५८ वर टँकरचा आकडा गेला. ही सारी परिस्थिती पाहता मराठवाड्याचा टॅंकरवाडा होतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावरचीच ही घडवून आणलेली चर्चा.
कोकण, कृष्णा आणि भंडारा येथून पाणी आणावं लागेलछत्रपती संभाजीनगर, जालना आणि कोकणच्या काही भागांसाठी कोकणकडे वाहून जाणारे १६० टीएमसी पाणी वळवावे लागणार आहे. हे काम युद्धपातळीवर करण्याची गरज आहे, तसेच कृष्णा खोऱ्यातून ४५ टीएमसी पाणी घेऊन लातूर, उस्मानाबाद व बीडच्या काही भागांची गरज भागवता येईल. नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांसाठी विदर्भातील भंडाराहून बुलढाणामार्गे पाणी आणून ते पैनगंगा-येलदरीत सोडता येईल. ५३ हजार कोटींची ही योजना आहे. या योजनेला मंजुरी मिळाली, पण काम सुरू व्हायला पाहिजे.- शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ व अध्यक्ष मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान
दुष्काळ पडल्यावरच चर्चा सुरू होतेपाणी प्रश्न जाणीवपूर्वक हाताळण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तो होताना दिसत नाही. दुष्काळ पडल्यावर किंवा भीषणता वाढल्यानंतर चर्चा सुरू होते. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कुठलाच कृती कार्यक्रम दिसून येत नाही. जलयुक्त शिवारानं पाणी प्रश्न वाढणार आहे, असं माझं मत आहे.ही योजना शास्त्रशुध्द वनाही. कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तात्पुरत्या योजनांबरोबर दीर्घमुदतीच्या योजना हाती घेण्याची गरज आहे.- विजयअण्णा बोराडे, कृषि तज्ज्ञ
समन्यायी पाणी वाटपातही विलंब व अन्यायचसमन्यायी पाणी वाटपातही मराठवाड्यावर अन्यायच होत आलेला आहे. हे पाणी सोडायला एक तर विलंब केला जातो. यावर्षी याचा अनुभव आपण घेतला. एक तर वरच्या भागात अनावश्यक धरणं बांधून ठेवण्यात आली. त्यामुळे पाणी वरच्या वर अडवण्यात येते. समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा येतो, त्यावेळीही नगर- नाशिकची मंडळी कोर्टबाजी करताना दिसतात. पाणी सोडण्याची त्यांची भूमिका नसते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.- अनिल पटेल, माजी राज्यमंत्री
उकई धरणातून पाणी मिळायला पाहिजे....धुळ्याच्या उकई धरणातून १६० टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळायला हवे. कृष्णा खोऱ्याचे २३.६६ टीएमसी पाणी अद्याप मराठवाड्याला मिळालेले नाही. राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठवाड्याचा टँकरवाडा होतोय. जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. पश्चिम वाहिन्यांच्या पाण्यामुळे प्रश्न सुटू शकतो. पण ते मृगजळच ठरण्याची शक्यता अधिक आहे.-रमेश गायकवाड, माजी सदस्य, छ. संभाजीनगर जिल्हा परिषद
पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात आणावेच लागेल.....पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्यात आणावेच लागणार आहे. नार, पार, दमणगंगा, वैतरणा, वैतरणा मध्य अशा नऊ उपखोऱ्यांतून हे पाणी दमणगंगेमार्फत गोदावरीत आणून सोडण्याची ही योजना आहे. मराठवाड्यातील १७ धरणांमध्ये या पाण्याचे लूक पद्धतीने वितरण करावे लागणार आहे. त्यावर तब्बल चाळीस हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना पुनरुज्जीवित केली आहे. ती पूर्ण झाली तर मराठवाड्याला टँकरवाडा होण्यापासून आपण वाचवू शकू.- प्रशांत बंब, आमदार, गंगापूर - खुलताबाद तालुका