औरंगाबाद : शहराच्या आसपास असलेल्या विविध वसाहतींना महापालिका टँकरने पाणीपुरवठा करते. टँकरचे बिल थकल्याने बुधवारपासून कंत्राटदाराने कामबंद आंदोलन सुरू केले होते. मागील दोन दिवसांमध्ये शहरातील शंभरपेक्षा अधिक वसाहतींना थेंबभर पाणीही मिळाले नाही. पाण्याची ओरड सुरू होताच शुक्रवारी महापालिकेने कंत्राटदाराला दीड कोटीपैकी फक्त २६ लाख रुपये अदा केले. त्यानंतर दुपारी टँकर धावायला सुरुवात झाली.
गुंठेवारी भागात राहणाऱ्या नागरिकांना टँकरवर तहान भागवावी लागते. आठवड्यातून दोनदा महापालिका नागरिकांना दोन ड्रम पाणी देते. त्यासाठी महिन्याच्या अगोदरच पैसे भरून घेतले जातात. गुरुवारी सकाळपासून अचानक ९५ टँकर बंद झाले. सातारा, देवळाई आणि शहरासाठी एकच कंत्राटदार मनपाने नियुक्त केला आहे. कंत्राटदाराने टँकरचे बिल द्यावे म्हणून अनेकदा प्रशासनाकडे विनंती केली. लेखा विभागाने त्याची अजिबात दखल घेतली नाही.
शहरातील टँकर बंद होताच महापालिका अधिकारी, पदाधिकाºयांची धावपळ सुरू झाली. गुरुवारी कंत्राटदाराला २६ लाख रुपये अदा केले. त्याने दीड कोटीतून किमान ५० लाख तरी द्यावेत, अशी मागणी आज महापौरांकडे केली. आणखी २४ लाखांचे बिल आगामी १० फेब्रुवारीपर्यंत देण्याचे आश्वासन लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी दिले. त्यानंतर महापौरांसमोरच फोन करून कंत्राटदाराने टँकर सुरू करण्याचे आदेश दिले.