राजू दुतोंडे , सोयगावउसाचा फड तर पाचविलाच पुजलेला. सहा महिने पाचटाशी लढा दिला नाही तर वर्षभर खाण्याचा प्रश्न. त्यामुळे उसतोड केल्याशिवाय पर्याय नसतो. तांड्यावरून ३० टक्के कुटुंब उचल घेऊन उसतोडीसाठी दरवर्षी स्थलांतरीत व्हायचे. पण, यंदाची दाहकता निराळीच आहे. हाताला काम नाही. नाही म्हणण्यापेक्षा मागितले तरी काम मिळणारच नाही, म्हणून तब्बल ७० टक्के गाव रिकामे झाले आहे. तांड्यावरून कुटुंबच्याकुटुंब उसतोडीला जाण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे तांड्यांचे जणू गावपणच हरपले आहे. यंदा खरीप हंगाम पूर्णपणे हातून गेल्यामुळे उसतोडीला जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढलेली आहे. प्रत्येक तांड्यातील ७० टक्के पुरुष-महिला मुलाबाळांसह ऊसाच्या फडात गेल्यामुळे तांडे ओस पडले आहेत. गुरेढोरे सांभाळण्यासाठी केवळ वयोवृद्ध मंडळी गावात दिसत आहेत.साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले की, ऊसतोड मजुरांची फडावर जाण्याची घाई सुरू होते. सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा, फर्दापूर तांडा, वरखेडी तांडा, निंबायती तांडा, न्हावी तांडा, रामपुरा तांडा, बहुलखेडा, नांदा तांडा, देव्हारी, टिटवी, घाणेगाव तांडा, चारूतांडा, हनुमंतखेडा, उप्पलखेडा, बनोटी तांडा, मोहळाई, नांदगाव तांडा, बोरमाळ तांडा आदी गावांतून ऊसतोड मजूर दरवर्षी ऊसतोडीला जातात. तसे यंदाही गेले. मात्र, त्यांची संख्या यावर्षी जवळपास दुप्पट वाढली आहे. खरीप उरकवून शेतकरी मजुरी मिळावी यासाठी ऊसतोडीला जातात. प्रत्येक तांड्यातून शेकडो जोडपे आपल्या मुला-बाळांसह घरदार सोडून स्थलांतरित होतात. गावातील मुकादमाकडून उचल घेऊन खरीप हंगामाची पेरणी मशागत करायची आणि घेतलेले पैसे फेडण्यासाठी ऊसतोडीला जायचे, अशी जणू परंपराच प्रत्येक तांड्यावर रुजलेली आहे.१जंगला तांडा गावची लोकसंख्या अंदाजे २२०० इतकी आहे. यातील जोडपे व मुले पकडून जवळपास दीड हजार लोक आजघडीला फडात पाचरटासोबत दिवसरात्र झुंजत आहेत. फैसपूर, गंगामाई, बारामती, दौंड आदी कारखान्यांवर हे मजूर गेलेले आहेत. गावात केवळ मोठे बागायतदार शेतकरी काही शाळकरी मुले-मुली आणि गुरेढोरे सांभाळण्यासाठी वयोवृद्ध मंडळी शिल्लक आहे. दुपारी तर ओस पडल्यासारखी स्थिती बंजारा तांड्यावर दिसत आहे.
तांड्यावरील ७० टक्के कुटुंबांचा पाचटाशी लढा!
By admin | Published: November 25, 2014 12:45 AM