उस्मानाबाद : शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. आजवर सुमारे १९ हजार २०२ कामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी यंत्रणेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडे २०१६-१७ च्या आराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साडेचार हजारावर कामांना कात्री लावल्याचे समोर आले आहे. सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे.या माध्यमातून कंपार्टमेंट बंडिंग, सीसीटी, माती नाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, लुज बोल्डर स्ट्रक्चर, बांध बंधिस्ती, साखळी सिमेंट नाला बांध, शेततळे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नाला खोलीकरण-सरळीकरण, गाळ काढणे, रिचार्ज शाफ्ट, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव दुरूस्ती, कालवा दुरूस्ती, वृक्षलागवड, रोपवाटीका आदी कामे हाती घेता येतात. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हाभरात मिळून सुमारे २१ हजार २५ कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये कृषी विभागाकडे सर्वाधिक १५ हजार २४८ कामे होती. आजवर १४ हजार ३२१ कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वन विभागाकडे २६९ कामे देण्यात आली होती. ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. लघु सिंचन विभागाकडे २५९ कामे होती. यातील २०४ कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाला ३७४ कामे देण्यात आली होती. परंतु, आजवर पन्नास टक्केही कामे पूर्ण झालेली नाहीत. प्रशासनाच्या अहवालानुसार केवळ १३५ कामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. जि.प.च्या अन्य विभागाकडूनही कामे करण्यात आली आहेत. २ हजार ८६ पैकी २ हजार ६२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. रिचार्ज शाफ्टचीही मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करण्यात आली होती. आजवर २ हजार ३७८ पैकी १ हजार ८१९ कामे पूर्ण झाली आहेत. मंजूर आणि झालेल्या एकूण कामांवर नजर टाकली असता आजही १ हजार ८२३ कामे पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत पुढील वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात सुमारे ४ हजार ५५८ कामे कमी मंजूर करण्यात आली आहेत. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जावू लागली आहे.(प्रतिनिधी)
‘जलयुक्त’च्या साडेचार हजारावर कामांना कात्री !
By admin | Published: January 01, 2017 11:33 PM