- राम शिनगारेऔरंगाबाद : शहर पोलिसांनी २०२१ या वर्षामध्ये नोव्हेंबरपर्यंत दाखल ६९५६ गुन्ह्यांपैकी तब्बल ५८५८ गुन्हे उघड करण्यात यश मिळवले. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे. पाच वर्षांत सर्वाधिक गुन्हे उघड होण्याचा हा विक्रम २०२१ मध्ये नोंदविण्यात आला. या गुन्ह्यांमध्ये पहिल्यांदाच गुन्हा करणाऱ्यांची संख्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
वर्षभरात हजारो आरोपींना अटकशहर पोलिसांनी वर्षभरात हजारो आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली. दाखल गुन्ह्यांपैकी उघड झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हा आकडा वर्षअखेरपर्यंत दहा हजारांपर्यंत पोहोचू शकतो, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
७० टक्के गुन्हेगार नवखेशहरात २०२१ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांपैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक जणांनी पहिल्यांदाच गुन्हा केलेला होता. पहिल्यांदाच केलेल्या गुन्ह्यात पकडल्यामुळे आरोपींवर कारवाई होते हा संदेश आरोपींमध्ये गेल्यामुळे पोलिसांच्या वाऱ्या, चौकशी नको, अशी भावना आरोपींमध्ये बनत असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुन्हा गुन्हा करू नये म्हणून...पोलिसांनी पकडलेल्या आरोपीने पुन्हा गुन्हा करू नये, यासाठी त्यांच्याकडून अंतिम बंधपत्र घेतले जाते. पोलिसांनी २०२१ च्या नोव्हेंबरपर्यंत ३६२७ जणांवर पुन्हा गुन्हा करू नये, म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यातील १९३४ जणांकडून अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे. याशिवाय जनजागृती, अभियानाच्या माध्यमातूनही गुन्हेगारीकडे युवकांनी वळू नये, यासाठी शहर पोलिसांनी प्रयत्न केले आहेत.
आरोपींमध्ये सर्वाधिक तिशीतीलपोलिसांनी पकडलेल्या आरोपींमध्ये सर्वांधिक संख्या ही तिशीतील युवकांची असल्याचेही एका पाहणीत समोर आले. सोशल मीडिया, पैशाचे आकर्षण यातून युवक गुन्हेगारीकडे वळल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होते.
सर्वांचे रेकॉर्ड ऑनलाईनपोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील प्रत्येक आरोपींचे रेकॉर्ड ऑनलाईन करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्या आरोपीवर कुठे आणि किती गुन्हे दाखल आहेत त्याविषयीची माहिती देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात मिळू शकते. सर्व प्रक्रिया ऑनलाईन झालेली असल्याचेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.