वाळूज महानगर: सिडको प्रशासनाच्यावतीने अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासकाविरुध्द कारवाई सुरुच आहे. तीसगाव परिसरातील तीन विकासकांविरुध्द मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सिडको अधिसूचित क्षेत्रात येणाºया १८ गावांत विकासकांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन अनेक वर्षापासून भूखंड व घराची विक्री सुरु ठेवली आहे. नगररचना विभागाकडून ले-आउट मंजूर न करता परस्पर ग्रामपंचायतीमार्फत ले-आऊट मंजूर असल्याचे भासवून या परिसरातील गरीब कामगार व नागरिकांना भूखंड व घराची विक्री विकासकाकडून करण्यात येत आहे. काही दिवसापासून सिडको प्रशासनातर्फे खाजगी गटनंबरमध्ये भूखंड व घरे खरेदी-विक्री करणाºया विकासकांविरुध्द कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
दरम्यान, तीसगाव परिसरातील गट क्रमांक २४५ मध्ये अनधिकृत बांधकाम प्रकरणी मंगळवारी विनायक पुंडलीक चौधरी, फकीरचंद बाबूराव गायकवाड व लक्ष्मी बाबूराव गायकवाड यांच्याविरुद्ध सहायक वसाहत अधिकारी गजाजन साटोटे यांनी तक्रार दिली आहे. यावरुन या तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.