वाळूज महानगर : तीसगाव परिसरातील बहुतांशी जलस्त्रोत आटल्याने गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून तीन टँकरने पाणीपुरवठा करुन नागरिकांची तहान भागविली जात आहे.
काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. याचा सर्वाधिक फटका वाळूज महानगरातील तीसगावला बसला आहे. गावातील बहुतांशी जलस्त्रोत आटले आहेत. तर काहींना केवळ १५ ते २० मिनिटेच तेही कमी दाबाने पाणी येत आहे.
त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेवून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा करुन ग्रामपंचायतीने तीन टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. एमआयडीसीच्या जलकुंभावरुन तीन टँकर प्रत्येकी दोन फेऱ्या केल्या जात आहेत. प्रत्येकाला ड्रमप्रमाणे पाणी दिले जात आहे.
मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात तीन टॅँकर कमी पडत आहेत. त्यातच दर शुक्रवारी लोडशिडिंग असते. शिवाय एमआयडीसीच्या जलवाहिनीत सतत काहीना काही तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. गावची लोकसंख्या लक्षात घेवून टँकरच्या फेºया वाढवाव्यात अथवा टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या विषयी ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावातील जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई सुरु आहे. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात सुरु असलेला पाणीपुरवठा पुरेसा आहे. असे लोकमतशी बोलताना सांगितले.