छत्रपती संभाजीनगर : पोटावर हात असणाऱ्यांना रोजचे दिवस काय, दसरा काय दिवाळी काय सारखेच. दिवसभर कष्टाची पेरणी केल्यावर चूल पेटते. चंद्र व चांदण्याच्या पडलेल्या प्रकाशातच सर्वजण जेवण करतात, कधी कधी उपाशीपोटी झोपी जातात, पण यंदाची दिवाळी त्यांच्यासाठी ‘आनंद’ घेऊन आली. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या पणती, दिव्याने झोपडी उजाळून निघाली, पहिल्यांदा झोपडीसमोर आकाशकंदील लागला व मुलाबाळांनी फराळाचा पोटभर आस्वाद घेतला. कोणी उपाशी राहिले नाही.
झोपडपट्टीत फराळाचा खमंग दरवळलामाळीवाडा परिसरात ८० झोपड्या आहेत. येथे आदिवासी गोंड कुटुंब राहतात. यंदा झोपडपट्टीत दिवाळी आनंद घेऊन आली. रोटरी क्लब ऑफ मेट्रो औरंगाबाद व आस्था जनविकास संस्थेने या गरीब कुटुंबांसाठी चिवडा, चकली, शंकरपाळे, शेव, लाडूचा फराळ आणला होता. फराळाचा खमंग सर्वत्र दरवळला होता. सर्वांनी अंगतपंगत करीत फराळावर ताव मारत आनंद व्यक्त केला.
झोपडीसमोर रांगोळीजिथे एक वेळस खाण्याचे वांद्ये असतात. तिथे रांगोळी खरेदी करून झोपडीसमोर काढणे दूरच, पण यंदा रोटरी क्लबच्या सदस्यांनी रंगीबेरंगी रांगोळी आणली व प्रत्येक झोपडीसमोर सुंदर रांगोळी काढली होती.
महिलांना साड्या, लहान मुलांना कपडेमाळीवाडा असो वा बीडबायपास परिसरातील झोपडपट्टी. येथे राहणाऱ्या महिलांना भेट म्हणून साड्या, लहान मुलांना रेडिमेड कपडे देण्यात आले. ही भेटवस्तू पाहून सर्व महिला व बालक जाम खूश झाले होते.
आयुष्यातील पहिली दिवाळीआम्ही आमच्या आयुष्यात अशी पहिली दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली. तसेच आम्ही दिवाळी असो दसरा थोडे गोडधोड करीत असतो, पण एवढ्या फराळाच्या प्रकाराचा पहिल्यांदा आस्वाद घेतला.-लाभार्थी, बीडबायपास झोपडपट्टी.
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन प्रसन्न झालेआपण आपल्या कुटुंबात दिवाळी जल्लोषात साजरा करीत असतो, पण झोपडपट्टीत जाऊन तेथील कुटुुंबांसमवेत दिवाळी साजरा करण्याचा आनंद अविस्मरणीय ठरला. दुसऱ्याच्या आनंदातच खरे सुख असते, याची प्रचिती आली. महिला असो वा मूल त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दरवर्षी असा उपक्रम राबविण्याचा आम्ही सर्वांनी निश्चिय केला, असे रोटरी क्लब ऑफ मेट्रोच्या अध्यक्षा आरती पाटणकर व आस्था जनविकास संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी सांगितले.