औरंगाबाद: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना EDने ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झाले होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. संजय राऊतांविरोधातील कारवाईवरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या कारवाईवरुन भाजपवर टीका केली आहे.
'ते मला अटक करत आहेत, अटक व्हायला मी तयार', ईडी कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया
मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, 'इंदिरा गांधी यांनी एकवेळा आणीबाणी लावली होती, पण संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेणे त्यापेक्षाही महाभयंकर आणीबाणी आहे. भाजपकडून शिवसेनेला संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण शिवसेना संपणार नाही. संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष करुन चौकशीचा ससेमीरा लावला.'
'केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. केंद्र सरकारच्या जुमली कारभाराविरोधात शिवसेना रान उठवल्याशिवाय राहणार नाही. पत्राचाळ आर्थिक व्यवहारात जर काही गदारोळ झाला होता तेव्हाच राऊतांना ईडीने ताब्यात घ्यायचं होतं. ईडीने शिवसेनेच्या बुलंद आवाजाविरोधात कारवाई केलीय. अशा तपास यंत्रणांविरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी आहे', असेही ते म्हणाले.