औरंगाबाद : शासनाच्या नियमानुसार १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्यांचे आधार नोंदणी करून १० वर्षे झाली आहेत, त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
आधार कार्ड काढल्यानंतर कालांतराने अनेक बदल होतात. जसे पत्ता, बोटांचे ठसे, नावातील चुका, मोबाइल क्रमांक नोंदीचे अद्ययावतीकरण होणे आवश्यक असते. त्यासाठी १० वर्षांनी आधार ईकेवायसी करणे बंधनकारक आहे. नजीकच्या आधार केंद्रावर जाऊन हे करणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील नागरिकांनी आधार कार्ड काढले नसल्यास व १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच आधार नोंदणी करीत असल्यास अशा नागरिकांच्या कागदपत्रांची जिल्हास्तरीय आधार समितीमार्फत तपासणी करण्यात येणार आहे.
..तर आधारकार्ड रद्द होईलआतापर्यंत आधारकार्ड का काढले गेले नाही, याची तपासणी समिती नागरिकांचे कागदपत्रे ऑनलाइन सादर झाल्यानंतर करेल. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधारकार्ड काढलेले नाही त्यांनी कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावेत. आधारकार्ड काढून दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यांनी आपले आधारकार्ड ई-केवायसी अपडेट करून घ्यावे. आधार अपडेट न केल्यास भविष्यात आधार नोंदणी रद्द होण्याची शक्यता आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.