औरंगाबाद : विभागीय परीक्षा मंडळाकडे बारावीच्या परीक्षा केंद्रासाठी ४३, तर दहावीच्या परीक्षा केंद्रासाठी ६ प्रस्ताव आले आहे. त्यासाठी प्रस्तावित केंद्रांची तपासणी ऑक्टोबरमध्ये होईल, असे विभागीय सचिव विजय जोशी म्हणाले. प्रचलित पद्धतीने पुढील बोर्ड परीक्षेचे नियोजन होणार असून उपकेंद्रावर नव्हे, तर मुख्य केंद्रावरच परीक्षा घेण्याचे संकेत बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहेत.
कोरोनानंतर दोन वर्षांनी झालेल्या परीक्षा केंद्र आणि उपकेंद्रावर झाल्या. गैरप्रकार समोर आले असले तरी काॅपीमुक्त परीक्षेचा दावा अधिकाऱ्यांना करता आला नाही. बहुतांश विद्यार्थ्यांना होम सेंटरवर मदत झाल्याचे प्रकार उघड झाले. निलजगाव येथील शाळेतील भौतिक सुविधा आणि काॅपीचे प्रकार राज्यभर गाजला, तर मासकाॅपीसाठी उत्तरांचे झेराॅक्स वाटपाआधीच पोलिसांनी जप्त केले. केंद्र आणि उपकेंद्राच्या घोळात शिक्षणाधिकारी आणि बोर्ड अधिकाऱ्यांना घाम फुटला होता, तर मुख्याध्यापकांचीच ही परीक्षा होती. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी परीक्षा या मुख्य केंद्रावर होण्याची चिन्हे दिसत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालय तपासणी १५ सप्टेंबरपासूनकनिष्ठ महाविद्यालयाच्या तपासणीसाठी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पथकांचे गठण करण्यात आले आहे. १५ सप्टेंबरपासून या पथकांची तपासणी मोहीम सुरू होईल. भौतिक, शैक्षणिक सुविधांसह प्रवेश, प्रशासकीय तपासणी हे पथक करणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक एस. एस. काळुसे म्हणाले.