छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तथा कवी संदीप शिवाजीराव जगदाळे यांना यावर्षीचा कोलकोत्ता येथील भारतीय भाषा परिषदेचा‘युवा पुरस्कार’ जाहिर झाला आहे. कविता लेखनासाठी हा पुरस्कार आहे. रोख ५१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जगदाळे यांचा ‘असो आता चाड’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. हिंदी कवितांचा अनुवादही त्यांनी केला आहे.
भारतीय भाषा आणि साहित्याच्या प्रसारासाठी भारतीय भाषा परिषद कार्यरत आहे. दरवर्षी चार भारतीय भाषांतील साहित्यिकांना ‘कर्तृत्व सन्मान’ आणि ‘युवा पुरस्काराने’ सन्मानित करतात. परिषदेच्या अध्यक्ष डॉ. कुसुम खेमानी आणि संचालक शंभूनाथ यांनी ११ मार्च रोजी यंदाचे पुरस्कार जाहीर केले. जसवीर भुल्लर (पंजाबी), एम. मुकुंदन (मल्याळम), राधावल्लभ त्रिपाठी (संस्कृत) आणि भगवानदास मोरवाल यांना ‘कर्तृत्व सन्मान’ जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर संदीप शिवाजीराव जगदाळे (मराठी), आरिफ रजा (कन्नड), गुंजन श्री (मैथिली), जसिंता केरकट्टा (हिंदी) यांना युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. २० एप्रिल रोजी कोलकाता येथे मान्यवरांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.