औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील कदीम टाकळी येथील विकास रावसाहेब थोरात (२५) याचा खून त्याच्याच गावातील तरुणाने साला आणि भाच्याच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मुख्य आरोपीच्या पत्नीला मृत विकास सतत फोनवर अश्लील बोलून त्रास देत असल्याने त्याचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले. पोलिसांनी आरोपींना अटक केली.
संजय बाबूराव थोरात (३७, रा. कदीम टाकळी), अनिकेत सुधाकर आव्हाड (२१, रा. लोणी, ता. वैजापूर, ह.मु. कदीम टाकळी) आणि बाळू माणिक नितनवरे (रा. क्रांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरापूर शिवारातील विहिरीत १४ जुलै रोजी विकासचा मृतदेह आढळला होता. विकासच्या शरीरावर जखमा असल्याने त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह विहिरीत टाकल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी सिल्लेगाव पोलीस ठाण्यात रावसाहेब थोरात यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप सोळंके, हवालदार विठ्ठल राख, दीपेश नागझरे, विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, गणेश गांगवे, संजय तांदळे, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने या खुनाचे रहस्य उलगडले.
आरोपी संजय थोरात याच्या पत्नीला मृत विकास हा फोनवरून अश्लील बोलत असे. त्यामुळे संजयने त्यास समज दिली होती. मात्र त्यानंतरही त्याच्याकडून त्रास देणे सुरूच होते. यातूनच हा खून झाल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर तांत्रिक पुरावा मिळवून पोलिसांनी संजय आणि अनिकेत आव्हाडला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, विकास पत्नीला त्रास देत असल्याने मी माझा साला बाळू आणि भाचा अनिकेत यांना बोलावून घेऊन विकासला कायमचे संपविण्याचे ठरविले. त्यानुसार ९ जुलै रोजी आरापूर शिवारातील शेतात आम्ही तिघे असताना विकासला आवाज देऊन बोलावून घेतले. तेथेही तो आम्हाला धमकी देऊ लागल्याने मी त्याचा दोरीने गळा आवळला, अनिकेतने दगडाने मारले तर बाळूने गुप्तांगावर आणि अन्य ठिकाणी लाथाबुक्क्याने मारहाण केली. यात तो ठार झाला.
कारमधून मृतदेह नेला आरापूर शिवारातमृतदेह पोत्यात भरून कारमध्ये टाकून आरापूर शिवारात आणला. रस्त्यावरील दगड मृतदेहाला बांधला आणि विहिरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली. यानंतर पोलिसांनी अनिकेतला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानेही हाच घटनाक्रम सांगितला.