औरंगाबाद : शहरातील व्हॉईट टॅपिंगच्या रस्त्यांची कामे २० दिवसांपासून बंद पडली असून, सार्वजनिक वाहतुकीला त्याचा प्रचंड त्रास होतो आहे. कामे सुरू करण्याप्रकरणी मनपा आणि कंत्राटदार काहीही लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे गुरुवारी विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. मुदतीत काम करून घेण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून, विलंब झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी विभागीय आयुक्तांसमक्ष दिला. विभागीय आयुक्त डॉ.दांगट, आयुक्त बकोरिया, शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यासह व्हॉईट टॅपिंगच्या रस्त्यांसाठी साईट इन्चार्ज असलेल्या उपअभियंत्यांची बैठकीला उपस्थिती होती.मनपातील भ्रष्ट यंत्रणेवर विश्वास नसल्यामुळे राज्य शासनाने विभागीय प्रशासन, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या कामांच्या निविदा काढण्याचे आदेश दिले. त्या कामांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही अनियमितता होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आदेशही शासनाने दिले. २० महिन्यांपूर्वी त्या रस्त्यांसाठी निधी मिळाला. त्यानंतर रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली. १८ महिन्यांच्या कालावधीत व्हॉईट टॅपिंगमध्ये निवडलेले रस्ते करण्यासाठी जीएनआय इन्फ्रा.ला कंत्राट देण्यात आले. कंत्राटदाराने गतीने काम करण्यास सुरुवात केली. परंतु काही उपटसुंभांनी रस्त्यांच्या कामात आडकाठी आणली. परिणामी रस्त्यांची कामे थांबली आहेत. यामध्ये जयभवानीनगरमार्गे पुंडलिकनगर ते गजानन मंदिर, सेव्हन हिल ते सूतगिरणी, एकता चौक रस्त्याचे काम बंद आहे. २४ कोटी ३३ लाखांतून निवडण्यात आलेल्या सहापैकी एक रस्ता बदलण्यात आला आहे. पालिका या रस्त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेत आहे, याची विचारणा विभागीय आयुक्तांनी केली.
‘त्या’ रस्त्यांची कामे बंद
By admin | Published: May 13, 2016 12:13 AM