छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पीएच.डी. युगल संशोधक जळीत प्रकरणात विद्यापीठ प्रशासनाने शहर पोलिसांच्या अहवालावरून तीन प्राध्यापक आणि एका अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली असून, चौकशी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात संशोधक तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत संशोधक तरुणीला कवटाळले. ही घटना शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेत २१ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली. या घटनेत संशोधक तरुण गजानन मुंडे याचा पहिल्याच दिवशी तर तरुणी पूजा साळवेचा ५४ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला.
पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या चौकशी पथकाने केलेल्या तपासात तरुणाने जाळून घेण्यापूर्वी विद्यापीठ वसतिगृहातील खोलीमध्ये बोर्डवर लिहिलेली सुसाइड नोट सापडली. तसेच त्याची चिठ्ठीही सापडली. तरुणीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून आरोपी गजानन मुंडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. मात्र, आरोपीसह पीडितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण केल्यानंतर न्यायालयात अबेटेड समरी सादर केली.निरीक्षक बागवडे यांच्या तपासामध्ये प्राणीशास्त्र विभागातील तीन प्राध्यापकांना दोन्ही संशोधक तरुणांमधील वादाची, प्रेमसंबंधाविषयी माहिती होती. तरुणीने विभागप्रमुखांकडे तक्रारही केली होती. तसेच तरुणाने १६ सप्टेंबर २०२२ रोजी प्रशासकीय इमारतीसमोरील रस्त्यावर अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा तेथे उपस्थित विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने दोघांनाही तेथून हाकलून दिले.
मात्र, घटनेची माहिती विद्यापीठ प्रशासनाला कळवली नाही. प्राध्यापकांसह अधिकाऱ्याने प्रशासनाला तरुणांचा वाद, घटना कळविल्या असत्या तर त्यात उचित कारवाई होऊन घटना टळली असती. त्यामुळे भविष्यातील घटना टाळण्यासाठी पावले उचलावीत, असा अहवालच शहर पोलिसांनी विद्यापीठाला सादर केला. त्यानुसार कुलगुरूंनी चौघांची विभागीय चौकशी लावली.
चौकशी अंतिम टप्प्यातयात चौघांची विभागीय चौकशी सुरू आहे. ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. चौकशी अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा निर्णय कुलगुरू घेतील, अशी माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.