लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भूमिगत गटार योजनेअंतर्गत कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर दररोज ५६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. शुद्ध केलेले पाणी फेकून देण्यापेक्षा ते तूर्त शहरातील रस्त्यांवर आणून टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरवासीयांना धूळकणांचा होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा मनपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारपासूनच या उपक्रमाला सुरुवात करण्यात येत आहे.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी हायस्कूलसमोरील रोड धूळमुक्त करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला. या उपक्रमाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला नाही. ४०० कोटी रुपये खर्च करून महापालिकेने शहरात भूमिगत गटार योजना राबविली. या योजनेनुसार कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर दूषित पाणी नेण्यात येत आहे. दररोज येथे ५६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे पाणी कोणीही घेण्यास तयार नाही. वापरण्यासाठी हे पाणी उत्तम आहे. दोन टँकरच्या मदतीने तूर्त या पाण्याचा उपयोग शहरातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्यासाठी करावा, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कांचनवाडी येथील ट्रीटमेंट प्लँटवर आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या आदेशाने टँकर भरण्यासाठी स्टँड पोस्ट तयार करण्यात आले आहेत. गुरुवारपासून दोन टँकर वापरण्यायोग्य पाणी शहरातील मुख्य रस्त्यांवर आणून टाकण्यात येणार आहे. संबंधित टँकरवर मराठीत वापरण्याचे पाणी असे लिहिण्यात येणार आहे. बुधवारी रात्री शहरातील काही रस्त्यांवरही पाणी आणून टाकण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.दरवर्षी महापालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. पाण्याअभावी असंख्य झाडे जळून जातात. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात येते. फक्त पाणी नसल्याने झाडे वाळून जात आहेत. कांचनवाडी येथील पाणी काही दुभाजकांमधील झाडांसाठीही करावा, असा विचार पदाधिकारी, नगरसेवकांनी व्यक्त केला. टँकरची संख्या वाढवून मिळाल्यास हा सुद्धा प्रयोग करून पाहण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘त्या’ पाण्याने रस्त्यांची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:14 AM