सोयगाव ( औरंगाबाद ) : नगरपंचायत निवडणुकीत केवळ १५ मतांनी तीन जागा जिंकलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्याने माझ्या विरोधात निवडणूक लढविण्याची भाषा करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. सोयगावात भाजपा भक्कमच असून तो भाजपाचाच बालेकिल्ला आहे. १५ मते पडली नसती तर चणे फुटाणे खिशात घेवून फिरणाऱ्या अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) याची काय अवस्था झाली असती हे मी सांगायला नको, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी शनिवारी बनोटीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान लोकमतशी बोलतांना लगावला. दोन दिवसापूर्वी राज्यमंत्री सत्तार यांनी दानवेंना वखरावर पाठवणार असल्याचे वक्तव्य केले होते.
सोयगाव नगरपंचायत शिवसेनेने एकहाती घेतलीच नाही, तीन जागा अवघ्या १५ मतांनी विजयी झाल्याने त्यांनी आत्मपरीक्षण करावेत. राहिला विषय मला वखरावर पाठविण्याचा तर मुळातच मी शेतकरी कुटुंबातील आहे. त्यामुळे मला वखरावरील कामाची सवय आहे, ही सवय राज्यमंत्री सत्तार यांनी लावून घ्यावी असा टोला दानवे यांनी सत्तार यांनी लगावला. सत्तार यांनी टोपी घालावी की नाही याबाबत मी सांगत नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी मला पराभूत करण्याचे स्वप्न कदापि पाहू नये असे दानवे म्हणाले. तुम्ही जालन्यातून मला पराभूत करण्याची रणनीती आखत आहत, मी तर कन्नडला सुद्धा भाजपामय करण्यासाठी बनोटीला आलो असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद स्वबळावर लढणारकन्नड-सोयगाव तालुक्यात भाजपा भक्कम करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी शनिवारी बनोटीला आढावा घेत नेतृत्वाबाबत चर्चा केली. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी तयारी करावी. या निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती होणे अशक्य असल्याचे सांगून राज्यभर भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले.