औरंगाबाद : राज्यात कायद्याचा धाक न राहिल्याने महिला अत्याचारांत वाढ होत असल्याचा आरोप भाजपा ( BJP ) नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी केला. राज्यात शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी निजामशाही आणली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात महिला सुरक्षा नसल्याची टीकाही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला चढवून दोन महिलांवर अत्याचार केला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वाघ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शहरात पत्रकारांशी बोलताना दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. याप्रसंगी माजी महापौर भगवान घडमोडे, महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष ॲड. माधुरी अदवंत, जि.प.महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, पैठण तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, शहराध्यक्ष अमृता पालोदकर उपस्थित होते.
वाघ म्हणाल्या, तोंडोळीतील घटना राजकारणाचा विषय नाही, परंतु अशा घटनानंतर राज्य सरकारकडून संवेदना दाखविली जात नाही. आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, पीडित कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा सरकारने अजूनही आणलेला नाही. महिला अत्याचारांच्या विषयावर राज्यपालांनी विशेष अधिवेशन घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. पण मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनाच उलट पत्र लिहून इतर राज्यांतील महिला अत्याचारांचे दाखले दिले. महिला अत्याचारांविरोधात आम्ही बोलतो, तेव्हा विरोधकांचे थोबाड फोडा असे म्हणणारे शिवसेना नेते संजय राऊत तोंडोळीतील घटनेवर गप्प का, असा सवाल वाघ यांनी केला.
औरंगाबाद पोलिसांची भूमिका संशयास्पदराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रकरणात औरंगाबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप वाघ यांनी केला. न्यायालयाने बी समरीचा रिपोर्ट फेटाळून लावत या प्रकरणाची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता फेरचौकशी होणार आहे, पण अजूनही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपीला अटक न करता चौकशी कशी होणार, असा सवालही त्यांनी केला.