छत्रपती संभाजीनगर: घराणेशाहीवर संजय राऊत हे बोलत असतात, त्यांच्याकडे काेणी लक्ष देत नाही, पण बापाच्या जहांगीरीवर येथे आलेल्या उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीवर बोलू नये, आगामी निवडणुकीत लोकच त्यांना त्यांची जागा दाखवतील,असा टोला, शिवसेना प्रवक्ता आ. संजय सिरसाट यांनी लगावला.आ. सिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे कल्याणला चालले आहे, याकडे तुम्ही कसे बघता, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. सिरसाट म्हणाले की, मी आज आनंदी आहे, कारण की ते वरळी , ठाणे सोडून १९ वर्षानंतर एखाद्या शाखेत चालले आहेत.त्यांनी महाराष्ट्रात फिरावं, असा आपला त्यांना सल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करताना ठाकरे दरवेळी बाप, जहांगीरी काढतात. खरे तर हेच बापाच्या जहांगीरीवर आले आहेत, यांना आता आगामी निवडणुकीत लोक जागा दाखवतील. राम मंदिरात हे आले काय, नाही आले काय, काही फरक पडत नाही असेही त्यांनी सांगितले. मिलिंद देवरा यांना एक वारसा आहे. ते काँग्रेसमध्ये असंतुष्ट आहे असे वाटतं, पण ते जर शिवसेनेते आले तर कोठेही संघर्ष होणार नाही, उलट आमची ताकद वाढेल असा दावा त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर आता राजकीय घडामोडींना सुरवात झाली आहे. सगळे आमच्याकडे येण्यास उत्सूक आहे पण कुणाला घ्यायचं ते मुख्यमंत्री ठरवणार असल्याचे ते म्हणाले.
न्यायालयातही आमची सरशी होईलआमदार अपात्रतेचा निर्णय आमच्या बाजूने लागल्यामुळे ठाकरे यांचा पक्ष न्यायालयात जाणार असल्याचे सांगितल्यानंतर सिरसाट म्हणाले की, त्यांना जायचे तर जाऊ द्या, तेथेही आमचीच सरशी होईल. गद्दार कोण हे त्यांनी आघाडी सोबत जाऊन दाखवून दिले. गद्दारी त्यांनी केली आम्ही नाही, यामुळे लोक त्यांना जागा दाखवतील असही ते म्हणाले.
उद्धवसोबतचे चार लोक म्हणजे संपूर्ण राज्य...महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांचे पूर्ण महाराष्ट्र त्यांचा बाळलेकिल्ला आहे सर्व शिवसैनिक म्हणजे त्यांच्या जवळचे 4 लोक असल्याची खोचक टीकाही सिरसाट यांनी केली.