‘ज्यांना जायचंय त्यांनी तात्काळ जावं, काँग्रेस शुद्ध होईल’ : सचिन सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 02:44 PM2019-07-31T14:44:36+5:302019-07-31T14:46:32+5:30
प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत तरी लढू
औरंगाबाद : ‘ज्यांना ‘तिकडे’ म्हणजे भाजप-सेनेत जायचंय त्यांनी तात्काळ जावं. त्यामुळं काँग्रेस शुद्ध होईल’, असा टोला आज येथे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी हाणला. ते गांधी भवनात औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. निरीक्षक म्हणून त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा कमल व्यवहारे होत्या. दुपारी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.
‘वंचित बहुजन आघाडीचा बुरखा फाटलाय. त्यांच्यामुळं लोकसभेच्या काँग्रेसच्या किमान दहा जागांचं नुकसान झालं. त्यांचा कुणाला फायदा होतोय, हे लपून राहिलेलं नाही. अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. त्यांचीही काही जबाबदारी आहे. आज संविधानाला धोका पोहोचत असताना सर्व धर्मनिरपेक्षशक्ती एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. खरं तर गांभीर्यानं घेता येईल, असा प्रस्ताव पाठवायला हवा; पण तसं त्यांच्याकडून होत नाही. ते सोबत आले नाहीत तरी आम्ही लढू’, असा इशाराही सावंत यांनी देऊन ठेवला.
‘मुख्यमंत्र्यांना स्पॉण्डिलिसिस होईल
एका प्रश्नाच्या उत्तरात सावंत उत्तरले की, मतांचा जोगवा मागण्यासाठी आता भाजप-शिवसेना यात्रा काढताहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १ आॅगस्टपासून सुरू होतेय; पण त्यांना ताठ मानेने जनतेसमोर जाता येणार नाही.
तुम्हीही असे काही का करीत नाही, असे विचारता सावंत म्हणाले की, जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेसने महाराष्ट्र पिंजून काढला आहे. लोकसभेची पार्श्वभूमी विधानसभेत राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला पाकिस्तान धावून येणार नाही. फडणवीसांशी मुकाबला आहे. गोळवलकर गुरुजी-हेडगेवार यांच्या विचारांशी फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा मुकाबला आहे. त्यात आमचाच विजय होईल. मराठवाड्यातील दुष्काळावर ठोस उपाययोजना नाही. महाराष्ट्रभरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशा रस्त्यांवरून ते रथातून नव्हे, रणगाड्यातून जरी गेले तरी त्यांना स्पॉण्डिलिसिस झाल्याशिवाय राहणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी. लोकांमध्ये आक्रोश आहे; पण मुख्यमंत्र्यांची अवस्था मात्र भरकटलेल्या जहाजासारखी झाली आहे.
हा बाजार...ही अनैतिकता
ते म्हणाले की, भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या इनकमिंग सुरू आहे, ती सूज आहे. भाजपला स्वत:चे कार्यकर्ते तयार करता आलेले नाहीत. ईडीचा धाक दाखवून ते पक्षांतर करून घेत आहेत.हा बाजार आहे. ही अनैतिकता आहे. हा निर्लज्जपणा चाललाय. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. ज्यांना जायचंय ते गेले तरी नव्या जोमानं पक्ष उभा राहील. तरुणांना संधी मिळेल.
काँग्रेस जनतेचा पक्ष
काँग्रेसला मोठा इतिहास आहे. १३२ वर्षांचा हा पक्ष आहे. काँग्रेस ही मूव्हमेंट आहे. जनतेचा पक्ष आहे. काँग्रेसने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. काँग्रेसला अशी आव्हाने नवी नाहीत. ते जातील, त्यांना लोकच धडा शिकवतील. यावेळी सिल्लोडमध्येही बदल होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी गद्दारी केलेल्यांना जनता माफ करणार नाही.