औरंगाबाद: बंडखोर कालपर्यंत म्हणायचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. पण आता त्यांची भाषा बदलली आहे. २० जून ते २० जुलै या महिनाभरात बंडखोर वेळोवेळी विविध कारणे देत आहेत. यावरून कळते की केवळ स्वतःच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी ही गद्दारी करण्यात आली, असा हल्लाबोल शिवसेना नेते, माजीमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केला. ते औरंगाबादच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.
शुक्रवारी नाशिक येथून आदित्य ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. वैजापूर, खुलताबाद येथून ते औरंगाबाद शहरात दाखल झाले. सायंकाळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मेळाव्यात संबोधित केले. त्यानंतर आज सकाळी ते पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ते रोडशोमध्ये सामील झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, खरी शिवसेना इथे जे शिवसैनिक दिसत आहेत ती आहे. ज्यांना शिवसैनिकांनी आपले मानले, ज्यांच्यासाठी दिवसरात्र एक केला, ज्यांना डोक्यावर घेतले त्यांनीच गद्दारी केली. हिंदुहृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या पाठीत कोणी खंजीर खुपसेल, हे कोणालाही अपेक्षित नव्हते. पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाची याबाबत आता कोणतीही भीती नाही, असेही आदित्य म्हणाले. दरम्यान, बंडखोर आमदार रमेश बोरनारे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.
जे आपले नाही त्याला चिटकून राहू नये ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडणार असे जाहीर केल्यानंतर वर्षा ते मातोश्री या दरम्यान अनेक शिवसैनिक, नागरिक रस्त्यावर उभे होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. वर्षा सोडवे लागले याचे दुःख नव्हते. फक्त आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा धक्का होता. आम्ही फक्त एकच विचार करत होतो, आमचे काय चुकले ? कोणतेही पद कायम नसते, जे आपले नाही त्याला चिटकून राहण्याचे काही कारण नाही. जनतेची सेवा करण्याचे माध्यम शिवसेना आहे, हाच आमचा विचार आहे. मी फक्त सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद घेण्यासाठी सर्वत्र जात आहे, असेही ठाकरे म्हणाले.