औरंगाबाद : मराठवाड्याला फेबु्रवारीच्या मध्यान्हातच दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. पाणीसाठे आटल्याने आणि शेतीपूरक कामे नसल्यामुळे विभागातून सुमारे १० हजार नागरिकांचे स्थलांतर झाल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (ईजीएस) कामांत दुपटीने वाढ झालेली असताना योजनेवरील सुमारे १० हजार मजूर कमी झाले आहेत. हे मजूर काम सोडून जाणे म्हणजे स्थलांतरित होणे असा अर्थ लावला जाऊ शकतो, असे मत विभागीय आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केले. योजनेच्या कामांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मजूर संख्या मात्र घटली आहे. हमी योजनेवर काम मिळत असले तरी पाण्याची कमतरता मराठवाड्यात जाणवू लागली आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजा आणि रोजगार याच्या शोधात मराठवाड्यातील नागरिक बाहेर पडत आहेत. विशेषत: परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे तेथील नागरिक स्थलांतर करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजूर कमी होण्याची संख्या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत दिसून येत आहे. ११ हजार ३५६ कामे सुरूआहेत. मागच्या आठवड्यात ६ हजार ६४६ कामे सुरू होती. कामांची संख्या वाढली असली तरी मजुरांची संख्या कमी झाली आहे. विभागातील धरणांमध्ये फक्त ७ टक्के पाणीसाठा आहे. लातूरला महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होतो आहे. मागील ४५ दिवसांत १२४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. रोजगार हमी योजनेच्या कामावर १६५ रुपयांच्या आसपास रोज मिळत असला तरी त्यातून भागेल, अशी शक्यता नसल्यामुळे मजूर संख्या घटू लागली आहे.
मराठवाड्यातील हजारोंचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2016 11:52 PM