लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गारखेडा भागातील बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी आदी वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नसल्याने मंगळवारी या भागातील संतप्त नागरिकांनी आ. अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांचे गा-हाणे ऐकण्यासाठी दुपारी १२.४५ वाजता भर उन्हात सावे यांना यावे लागले. त्यांनी कार्यालयात पाय ठेवण्यापूर्वीच महिलांना पाण्यासाठी माझ्याकडे कशाला येता, नगरसेवकाला पकडा, असे म्हणताच आंदोलक महिला आश्चर्यचकीत झाल्या.भाजपचे पदाधिकारी गोविंद केंद्रे, राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी, मेहेरनगर आदी भागातील अनेक महिला आ. अतुल सावे यांच्या कार्यालयावर पोहोचल्या. कार्यालयासमोरील पायऱ्यांवरच महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महिलांचे मोठे शिष्टमंडळ आल्याची माहिती मिळताच पावणे एक वाजता आ. अतुल सावे आले. वाहनातून उतरताच त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. प्रवेशद्वारावर उभ्या महिलांना माझ्याकडे कशाला येता, नगरसेवकाला पकडा, असे सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाला कार्यालयात बोलावून घेतले. त्यांच्यासमोरच मनपाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांना फोन लावला. तुमच्यामुळे माला आमदारकी सोडण्याची वेळ आली आहे. या भागातील पाणी प्रश्न सोडवा, असे सांगितले.नेहमीप्रमाणे चहेल यांनीही दोन दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पाणी प्रश्न आठवडाभरात मिटला नाही तर हंडा मोर्चा काढू, असा इशारा महिलांनी दिला. यावेळी प्रणीला त्रिभुवन, मीना शेळके, कमल बडक, कांताबाई राठोड, सुवर्णा पिल्ले, शीलागाडेकर, सुरेखा घोरपडे, शारदा शिंदे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.सहा दिवसांपासून पाणी नाहीमंगळवारी सकाळी आंबेडकरनगर भागात सहा ते सात दिवस झाल्यानंतरही पाणी न आल्याने परिसरातील नागरिक, महिलांनी एन-७ येथील पाण्याच्या टाकीवर येऊन संताप व्यक्त केला. नागरिकांनी नगरसेविका भारती सोनवणे यांच्याकडेही पाणी येत नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वजण पाण्याच्या टाकीवर आले. उपअभियंता अशोक पद्मे, गिरी यांची भेट घेऊन वॉर्डात येऊन पाहणी करण्याची मागणी करीत ठिय्या आंदोलन केले.
औरंगाबादेत पाण्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:19 AM
गारखेडा भागातील बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी आदी वसाहतींना टँकरनेही पाणी मिळत नसल्याने मंगळवारी या भागातील संतप्त नागरिकांनी आ. अतुल सावे यांच्या पुंडलिकनगर येथील संपर्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
ठळक मुद्देअतुल सावे : ‘माझ्याकडे कशाला येता, नगरसेवकाला पकडा;’ आंदोलक महिला झाल्या आश्चर्यचकित