औरंगाबाद : आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दि. १९) आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये साजरी करण्यासाठी तसेच ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी 'जय भवानी जय शिवाजी' जयघोषात हजारो शिवप्रेमी नागरिक औरंगाबादेतून आग्रा किल्ल्याकडे रेल्वेने रवाना झाले आहेत.
अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाउंडेशन यांच्या वतीने या सोहळ्याचे नियोज करण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून शनिवारी नांदेड-दिल्ली सफदरजंग विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी आ. सतीश चव्हाण, आ. प्रदीप जैस्वाल, हर्षवर्धन कराड, डीआरएम उपिंदर सिंग,तात्यासाहेब मोरे, पृथ्वीराज पवार, दयाराम बसय्ये, दत्ता भांगे आदी उपस्थित होते.