औरंगाबाद : जिल्ह्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाचे तीन हजारांवर रुग्ण आहेत. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाने या रक्ताधित व्यक्तींनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांनाही शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळणार आहे.
जिल्ह्यात आजघडीला हिमोफेलियाचे ५५०, थॅलेसेमियाचे २ हजार, तर सिकलसेलचे १ हजार रुग्ण असल्याची माहिती हिमोफेलिया सोसायटीच्या औरंगाबाद चॅप्टरतर्फे देण्यात आली. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल यांसारख्या रक्तदोषाने रुग्णांना अपंगत्व येते. केवळ दिव्यांग प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर येत होती. राज्य सरकारने रक्तदोषामुळे येणाऱ्या दिव्यांगत्वासह एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय १४ सप्टेंबर रोजी जाहीर केला. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तदोषाच्या रुग्णांनाही दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांगत्वाचे मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी कार्यप्रणालीही निश्चित करण्यात आली आहे.
२१ प्रकारचे दिव्यांगत्वदृष्टिदोष, कर्णबधिरता, शारीरिक दिव्यांगता, मानसिक आजार, बौद्धिक दिव्यांगता, बहुदिव्यांगता, शारीरिक वाढ खुंटणे, स्वमग्नता, मेंदूचा पक्षाघात, स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे जुने आजार, अध्ययन अक्षमता, मल्टिपल स्क्लेरॉसिस, वाचा व भाषा दोष, अॅसिड अटॅक व्हिक्टिम, पार्किनसन्स, दृष्टिक्षिणता, कुष्ठरोगासह थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल या एकूण २१ प्रकारच्या व्यक्तींना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारणा करण्याची गरज आहे
थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेलच्या रुग्णांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्यांचा अनेकांना फायदा होईल; परंतु हिमोफेलियाच्या टक्केवारीसंदर्भात सुधारणा करण्याची गरज आहे,असे वाटते.-प्रभुराम जाधव, हिमोफेलिया सोसायटी, औरंगाबाद चॅप्टर