- विकास राऊत
औरंगाबाद : जिल्ह्यात मागील पाच वर्षांपासून पाणीपुरवठा उपाययोजनांबाबत काहीही गांभीर्याने चिंतन न झाल्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण काही थांबेना. ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे पिण्याचे पाणी टँकरने पुरविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च जिल्हा प्रशासन करीत आहे.
पाच वर्षांत ८० ते १०० कोटींच्या आसपास टँकर लॉबीवर खर्च करण्यात आला आहे. सध्या मराठवाड्यात सर्वाधिक टँकर औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असून, ७ लाख ४० हजार लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. डिसेंबर महिन्याअखेर ४६३ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, जिल्ह्यातील ३६४ गावे आणि २४ वाड्यांना टँकरच्या पाण्याविना दुसरा पर्याय नाही. या गावांतील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पिण्याचे पाण्याचे स्रोत सरत्या वर्षातील पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असून, त्याचा मोठा परिणाम स्थलांतर होण्याचे संकेत मिळत आहेत. गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील स्थलांतर होण्यास सुरुवात झाल्याचे कानावर येत आहे. गंगापूर तालुक्यातील १०३ गावे आणि वैजापूर तालुक्यातील ६७ गावे टंचाईग्रस्त आहेत. फुलंब्रीतील ७१ गावे टंचाईग्रस्त आहेत.
७ लाख ४० हजार १०० लोकसंख्येला टँकरचे पाणीजिल्ह्यातील ७ लाख ४० हजार १०० लोकसंख्येला टँकरने पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. औरंगाबाद तालुक्यात ७७ हजार १००, फुलंब्रीत ४० हजार ७३१, पैठण १ लाख ४३ हजार ९६६, गंगापूर १ लाख ७७ हजार २१०, वैजापूर १ लाख ३ हजार ४८९, खुलताबाद २१ हजार ७८०, कन्नड २७ हजार ४४, सिल्लोड १ लाख ४९ हजार १४० नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागते आहे.
औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर ताणग्रामीण भागांना पाण्याचे भरून पाठविण्यात येणारे टँकर औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर भरले जात आहे. त्यामुळे शेंद्रा, वाळूज परिसरातील उद्योगांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. परिणामी औद्योगिक क्षेत्रातील नवीन नळ कनेक्शन देण्यावरही बंधने आली आहेत. टँकर भरण्यासाठी नवीन पंपिंग स्टेशन उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
सोयगाव वगळता कुठेही मिळत नाही रोज पाणी जिल्ह्यातील एकाही तालुक्यातील नळयोजनांना दररोज पाणीपुरवठा केला जात नाही. औरंगाबाद शहरात चार दिवसाआड, पैठण शहर १ दिवसाआड, सिल्लोड ३ दिवसाआड, सोयगाव दररोज, फुलंब्री १ दिवसाआड, कन्नड ३ दिवसाआड, वैजापूर ४ दिवसाआड, गंगापूर ३ दिवसाआड, खुलताबाद ५दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. असा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अहवाल आहे.
या तालुक्यांत परिस्थिती होणार गंभीरपाच तालुक्यात उपलब्ध असलेल्या साठ्यातील पाणी ३० जून २०१९ पर्यंत पुरेल अशी परिस्थिती नाही. यामध्ये खुलताबाद, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, आणि सिल्लोड या तालुक्यांत पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरविना पर्याय नाही.
जलुयक्त शिवारचे पाणी कुठे मुरलेजिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात सिंचन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. असे असताना जलयुक्त शिवार योजनेतील पाणी कुठे मुरले, असा प्रश्न आहे. मागील तीन वर्षांत ५०० च्या आसपास गावांमध्ये योजनेतून कामे करण्यात आली. त्यावर कोट्यवधींचा खर्च झाला. परंतु त्यातून मोठ्या प्रमाणात लाभ झाला नसल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.
जलयुक्त शिवार योजनेत हात मारलाटँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्यामागे मूळ कारण म्हणजे जलयुक्त शिवार ही योजना आहे. जुन्या पाणीलोट कार्यक्रमाच्या तुलनेत ही योजना कार्यकर्ते पोसण्यासाठीच आणली. यावर्षी निसर्गाने त्या योजनेचा पंचनामा केला आहे. जर या योजनेमुळे भूजल पातळी वाढली असती तर नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी मिळाले असते. पावसाने हुलकावणी दिलेली नाही, सरकारने नियोजन न केल्यामुळे दगाफटका बसला आहे. हा दुष्काळ शासननिर्मित आहे. निसर्गनिर्मित नाही. ही सगळी वावटळ आहे. ओढे, नद्या, नाल्यांचे खोलीकरण करून ते उद्ध्वस्त केले आहेत. ही चिंतेची बाब आहे. जलयुक्त शिवार योजनेवर सरकारने हात मारला, असा माझा आरोप आहे. -प्रा. एच.एम. देसरडा, अर्थतज्ज्ञ
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची मागणी अशी
तालुक्याचे रोज पिण्याच्या उपलब्ध पाणीनाव पाण्याची मागणी किती दिवस पुरेल
औरंगाबाद १४६ एमएलडी २०६ दिवस (जायकवाडी धरण)पैठण ४.११ एमएलडी २०६ दिवस (जायकवाडी धरण)सिल्लोड ४.३६ एमएलडी ११५ दिवस (खेळणा मध्यम प्रकल्प)सोयगाव ०.६२ एमएलडी २०६ दिवस (सोयगाव लघु प्रकल्प)फुलंब्री १.५० एमएलडी ७५ दिवस (फुलमस्ता नदी व विहिरी)कन्नड ३.५७ एमएलडी २०६ दिवस (अंबाडी मध्यम प्रकल्प)वैजापूर ३.९४ एमएलडी २०६ दिवस (गोदावरी डावा कालवा)गंगापूर २.६३ एमएलडी २०६ दिवस (जायकवाडी धरण खुलताबाद १.७५ एमएलडी ५६ दिवस (गिरजा मध्यम प्रकल्प )