लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोनामुळे व्यवसाय बंद, नोकरी गेल्याने उत्पन्नाचे स्रोत आटले. त्यात भरीस भर म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्याने कार (चारचाकी) आता पांढरा हत्ती ठरत आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडील कार विक्रीला काढल्या आहेत. शहरात आजघडीला एक हजारपेक्षा अधिक सेकंडहॅण्ड कार विक्रीला आल्या आहेत. जालना रोड, जळगाव रोड, हिमायत बाग रोड, गारखेडा रोडवर ‘फॉर सेल’ असे फलक अनेक कारच्या दर्शनी बाजूला लावण्यात आले आहेत.
गतवर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व कळले. सार्वजनिक वाहनाऐवजी स्वतःच्या कारमध्ये प्रवास करण्यास प्राधान्य दिले गेल्याने सप्टेंबरनंतर नवीन कारसोबत सेकंडहॅण्ड कारची विक्री वाढली होती. सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान शहरात सेकंडहॅण्ड दोन ते अडीच हजार कारची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यावेळेस मागणी वाढल्याने कारच्या किमती ६० ते ७० हजार रुपयांनी वाढल्या होत्या.
मात्र, आता दुसऱ्या लॉकडाऊननंतर परिस्थिती बदलली आहे. सेकंडहॅण्ड गाड्यांचे अर्थचक्र उलटे फिरू लागले आहे. या संदर्भात सेकंडहॅण्ड कारचे व्यावसायिक सचिन वाघ यांनी सांगितले की, दुसऱ्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प असल्याने अनेक व्यापाऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या, त्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. आता कार घरासमोर ठेवणे ‘पांढरा हत्ती’ पाळण्यासारखे वाटू लागल्याने ग्राहक सेकंडहॅण्ड कार विक्रीला आणत आहे. तर अनेकजण लॉकडाऊन उठण्याची वाट पाहत आहेत. शेकडो गाड्या उभ्या आहेत पण खरेदीदार नसल्याने कारच्या किमती ५० ते ६० हजारांनी कमी झाल्या आहेत.
हिमायत बाग रोडवरील कार विक्रेत्याने सांगितले की, आजघडीला शहरात एक हजार सेकंडहॅण्ड कार विक्रीला आल्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर यात ३०० ते ४०० कारची आणखी भर पडेल. कार खरेदीपेक्षा विक्री करणाऱ्यांचे फोन अधिक येत असल्याची माहिती शेख खलील यांनी दिली.
चौकट
सीएनजीकडे ओढा
लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने व पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने ग्राहक सेकंडहॅण्ड कार विक्रीला आणत आहेत, हे खरे आहे. तसेच पेट्रोल-डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने जुनी गाडी विकून नवीन सीएनजी कार खरेदीकडे मानसिकता वाढत आहे.
- अतुल कुलकर्णी, व्यवस्थापक, ब्रँडेड कार शोरूम