औरंगाबाद : समाधानकारक पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे प्रशासनाने काही तीव्र टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. जिल्ह्यातील साडेबारा हजार लोकसंख्येची तहान सध्या टँकरवर भागविली जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सद्य:स्थितीत नऊ टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात ८ आणि वैजापूर तालुक्यात १ टँकर सुरू आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पावसाळा संपताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.विशेषत: पैठण आणि वैजापूर या दोन तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक आहे. पैठण तालुक्यातील दादेगाव, सोनवाडी, हर्षी बु., थेरगाव, हर्षी खु. तसेच वैजापूर तालुक्यातील बाबतारा या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असलेल्या गावांची एकूण लोकसंख्या १२ हजार ४०२ इतकी आहे. टँकरबरोबरच विहीर अधिग्रहणालाही सुरुवात झाली आहे. प्रशासनाने वैजापूर तालुक्यात एक विहीर अधिग्रहित केली आहे. ३९ टक्केकमी पाऊसजिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७५ मिमी आहे. प्रत्यक्षात केवळ ४१२ मिमी म्हणजे वार्षिक सरासरीच्या अवघा ६१ टक्केच पाऊस झाला आहे. सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ५८८ मिमी, तर सर्वांत कमी पैठण तालुक्यात ३०९ मिमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात ४१४ मिमी, फुलंब्री तालुक्यात ४२७ मिमी, वैजापूर तालुक्यात ३३८ मिमी, गंगापूर तालुक्यात ३१३ मिमी, खुलताबाद तालुक्यात ३२८ मिमी, सिल्लोड तालुक्यात ५१९ मिमी, कन्नड तालुक्यात ४७८ मिमी पाऊस झाला आहे.टंचाई भीषण होण्याची शक्यताजिल्ह्यात गतवर्षी डिसेंबरच्या शेवटी टँकर सुरू करण्याची गरज पडली होती. मात्र, यंदा अपुऱ्या पावसामुळे सप्टेंबरच्या अखेरीसच टँकर सुरू झाले आहेत. शिवाय यंदा भूजल पातळी खूप खालावलेली असल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षाही जास्त भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
आताच साडेबारा हजार लोकांची तहान टँकरवर
By admin | Published: October 22, 2014 12:43 AM