औरंगाबाद : गणेशोत्सव ते दिवाळीपर्यंत महासणांचा हंगाम आहे. या काळात बाजारपेठेत मोठी उलाढाल होते. त्यानंतर लग्नसराईला सुरुवात होते. यामुळे ऐनवेळेवर कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवू नये म्हणून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी नोकर भरती केली आहे. दरम्यान, ८ हजार बेरोजगारांना हंगामी नोकरी मिळाली आहे.
विशेष म्हणजे कोरोना, लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या लोकांना सणासुदीत दिलासा मिळाला आहे. दरवर्षी व्यापारी सणासुदीच्या निमित्ताने हंगामी नोकरभरती करीत असतात. त्यांच्याकडे कायमस्वरूपी कर्मचारी थोडेच असतात. सणाच्या काळात जास्तीचे कर्मचारी भरती केली जाते. मागील वर्षी कोरोनामुळे दीर्घकाळ लॉकडाऊन सुरू राहिल्याने अनेकांच्या नोकरीवर गदा आली होती. त्यातील जे बेरोजगार होते त्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा व्यापाऱ्यांनी कामावर घेतले आहे. कारण, आता ग्राहक खरेदीसाठी बाजारात येत असून, अशीच परिस्थती राहिली, तर यंदा उलाढाल चांगली होईल, अशी व्यापाऱ्यांना आशा आहे. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट................
दरवर्षी होते नोकर भरती
बाजारपेठेत विशेषत: कापड, किराणा, कटलरी, भेट वस्तू अन्य क्षेत्रांत नोकरभरती होत असते. मागील वर्षी निर्बंधामुळे कोणी अतिरिक्त नोकरभरती केली नव्हती. जे नोकरीवर होते त्यातील ३० ते ४० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, मागील १५ दिवसांत व्यापाऱ्यांनी नवीन भरती केली आहे.
-जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ
--
चौकट..........................
बाजारपेठेतील स्थिती
३० हजार लहान-मोठे व्यापारी
१ लाख नोकर, कर्मचारी
१५ हजार लोकांनी लॉकडाऊनमध्ये गमविली नोकरी
८ हजार बेरोजगारांना हंगामी मिळाली नोकरी