वाळूज महानगर : समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन ज्येष्ठ कीर्तनकारास ३० हजारांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी ज्ञानेश्वर सुलाने व अशोक गावंडे या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार कीर्तनकार अंबादास मारुती गावंडे (७२, रा. मांगेगाव, ह.मु. वाळूज) व यांच्यासोबत ज्ञानेश्वर सुलाने (रा. सासेगाव, ता. कन्नड) हेसुद्धा समाजप्रबोधनाचे काम करतात. १० मे रोजी गावंडे व सुलाने हे दोघे सातारा येथील पाडळी गावात कीर्तनासाठी गेले होते. कीर्तन आटोपल्यानंतर दोघेही आळंदीला एका धर्मशाळेत मुक्कामाला थांबले होते. ते दोघे १३ मे रोजी वाळूजला परतले. सुलाने याने गावंडे यांना मला काही ओळखीच्या लोकांना घेऊन उत्तरप्रदेशातील वृंदावनला जायचे आहे, असे म्हणून ३० हजारांची मागणी केली. मात्र, गावंडे यांनी पैसे देण्यास नकार देताच, सुलाने यांनी हे तुम्हाला महागात पडेल, अशी धमकी देत आपल्या गावी निघून गेला होता.
गावंडे हे १५ मे रोजी पत्नी निर्मलासह पैठणला निघाले होते. ते वाळूजच्या बसथांब्यावर असताना सुलाने तेथे पोहोचला. त्याने पुन्हा ३० हजार रुपयांची मागणी केली व पुन्हा बदनामीची धमकी देऊन निघून गेला. गावंडे पती-पत्नी पैठणला गेल्यानंतर मांगेगावातील अशोक बारकू गावंडे याने गावंडे यांना फोन करून सुलानेने तुमचे काही फोटो दाखविल्याचे सांगितले. यानंतर सुलाने हा अशोक गावंडेच्या मध्यस्थीने बदनामी करण्याची सतत धमकी देऊन ३० हजारांची मागणी करू लागला. या सततच्या धमक्यांमुळे अंबादास गावंडे यांनी वाळूज पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. उपनिरीक्षक भगवान मुजगुले हे तपास करीत आहेत.