लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : व्यावसायिक राहुल पगारिया यांना पत्राद्वारे सात लाख रुपयांची खंडणी मागणा-या पगारिया यांच्या माजी कर्मचा-यास गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. रिक्षाच्या कर्जाचे हप्ते थकल्याने त्याने खंडणीची योजना आखल्याची कबुली पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी एका रिक्षाचालकास अटक केलेली आहे.सुरेश शंकरराव नरवडे (३६, रा.मिसारवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे म्हणाले की, व्यावसायिक राहुल पगारिया यांना १९ आॅक्टोबर रोजी एका रिक्षाचालकामार्फत सात लाख रुपयांचे खंडणी मागणारे पत्र मिळाले होते. हे पत्र घेऊन ते पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना भेटले. त्यानंतर आयुक्तांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले. तक्रारदारांच्या सुरक्षारक्षकाकडे पत्र देणारा रिक्षाचालक शेख चांद शेख अहमद (४३, रा.अंबिकानगर, मुकुंदवाडी) यास गुन्हे शाखेने शोधून काढले; मात्र खंडणीचे पत्र लिहिणारा कोण आहे, याबाबतचे कोडे कायम होते. गुन्हे शाखेचे पोलीस पगारिया यांच्याकडे काम करणा-या, सोडून गेलेल्या आणि काढून टाक लेल्या कर्मचा-यांची माहिती तपासत होते. यावेळी त्यांना दोन वर्षांपूर्वी काढून टाकलेला वाहनचालक नरवडे याने सीमकार्ड मिळविण्यासाठी मॅनेजमेंटकडे केलेल्या हस्ताक्षरातील अर्जाची प्रत मिळाली. या अर्जातील हस्ताक्षर आणि खंडणीच्या पत्रातील हस्ताक्षर सारखेच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अधिक माहिती मिळविल्यानंतर नरवडेने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्याचे आणि कर्जाचे चार ते पाच हप्ते थकल्याचे समजले. आर्थिक अडचणीत असल्याने त्याने हे कृत्य केले असावे, असा संशय बळावल्याने पोलिसांनी नरवडे यास रविवारी दुपारी उचलले. त्यास पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले. पगारिया यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नव्हता; मात्र फायनान्सवाले कोणत्याही क्षणी रिक्षा ओढून नेतील, ही नामुष्की टाळण्यासाठी आपण पगारिया यांच्याकडून सात लाख रुपये खंडणी उकळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. खंडणी मिळविण्यासाठीच पत्र लिहून रिक्षाचालक शेख चांद शेख अहमद (४३, रा.अंबिकानगर, मुकुंदवाडी) याच्याकडे १९ आॅक्टोबर रोजी दिल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पगारिया यांच्याकडे वर्कशॉपमध्ये तो वाहनचालक म्हणून वर्षभर कार्यरत होता, तेव्हा त्याचा त्यांच्याशी संबंधही येत नव्हता. डिझेलमध्ये हेराफेरी केल्याचे वर्कशॉप मॅॅनेजरच्या लक्षात येताच मॅनेजरनेच त्याला कामावरून कमी केले होते.या प्रकारामागे आणखी कोणी आहेत् का, याबाबतचा तपास पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि कर्मचा-यांनी केली.
पगारियांना खंडणी मागणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:28 AM