गोलापांगरी : जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील दुधना नदीच्या पात्रात श्यामराव लक्ष्मण चौगुले यांचा खून करून पळून गेलेल्या तिघाही आरोपींना तालुका पोलिसांनी शिताफीने जालना येथे पकडले.आरोपींनी ३० मे रोजी चौगुले यांना बेदम मारहाण केली. त्यात उपचार सुरू असताना ४ जून रोजी चौगुले यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी अविनाश आठवले, कोंडीराम गुलाब हातागळे व राहुल सीताराम येडे या तिघांना जालना येथे तालुका जालना पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल काळे, जमादार ज्ञानदेव नागरे, अंभोरे, भानुदास जांभोरे व इतरांनी या आरोपींना शिताफीने अटक केली. मारहाण केल्यानंतर मयताच्या खिशातील रोकड घेऊन आरोपी पळून गेले होते. अंबड मार्गावरील सतकर कॉम्प्लेक्स भागात कोंडीराम हातागळे याला ५ जून रोजी अटक केली होती. त्याला विश्वासात घेऊन अन्य आरोपींची माहिती विचारली. त्यानंतर अवघ्या काही तासातच इतर दोन आरोपींनाही रोहिला गल्ली भागातून अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींना ६ जून रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, सर्वच आरोपींना घेऊन पोलिस घटनास्थळावर आले. त्याठिकाणी पंचनामा करून आरोपींनी दिलेली सर्वच माहिती नोंदवून घेतली. मयताच्या अंगावर सिगारेटचे चटके दिसून आले. अंगावर चाबुक अथवा बेल्टने बेदम मारहाण केल्याच्या खुणाही आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात हे नमूद करण्यात आल्याचे काळे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले. आरोपींनी बेदम मारहाणीची कबुली दिली. मात्र चौगुले यांना जिवे मारण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. दारू प्राशन केल्याने तसेच उन्हाचा कडका असल्याने चौगुले अत्यावस्थ झाले होते. शिवाय काटेरी झुडपे असल्याने जखमी अवस्थेतील चौगुले कोणालाही दिसून आले नाही. तब्बल पाच ते सहा तास ते जखमी अवस्थेत घटनास्थळावर पडलेले होते, असेही काळे यांनी सांगितले. (वार्ताहर)दारू पिल्यानंतर पैसे हिसकावण्यासाठी मारहाणगोलापांगरी येथील श्यामराव चौगुले यांनी ३० मे रोजी तीन मित्रांसोबत मद्य प्राशन केले. मद्यधुंद अवस्थेत तिघा मित्रांनी त्यांना दूधना नदीच्या पात्रात नेले. त्या ठिकाणी खिशातील पैसे हिसकावण्यासाठी बेदम मारहाण केली. त्यांच्या शरीरावर सिगारेटने चटकेही दिले.
गोलापांगरी खून प्रकरणातील तीन आरोपी अटकेत
By admin | Published: June 10, 2014 12:18 AM