प्रोझोन माॅलमधील व्यवस्थापक, कर्मचारी आणि इतर एकाला दोषमुक्त करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा व्ही. कंकणवाडी यांनी दिला.
अर्शद सज्जाद अली, अमोल शेजूळ आणि ज्ञानेश्वर जराड अशी त्या तिघांची नावे आहेत.
८ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने सातारा परिसरात दोन ठिकाणी छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणारे दोन दलाल व इतरांविरोधात भादंवि कलम ३७० ए २ आणि अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३,४,५ आणि ६, मुंबई प्रतिबंधक कायदा कलम ६७ ए तसेच आयटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये घटनास्थळी आरोपी अर्शद सज्जाद अली, अमोल शेजूळ व ज्ञानेश्वर जराड हे गिऱ्हाईक सापडले होते. त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
पोलिसांनी तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटला सत्र न्यायालयात प्रलंबित होता. आरोपींतर्फे दोषमुक्त करण्यासाठी सत्र न्यायाधीश यांच्यासमोर अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अर्ज नामंजूर करून आरोपींविरोधात अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायदा कलम ५१ अ आणि भादंवि कलम ३७० ए २ नुसार दोषारोप ठेवण्याचे आदेशित केले होते.
सदर आदेशाविरोधात आरोपी अर्शद, अमोल शेजूळ व जऱ्हाड यांनी ॲड. अभयसिंह भोसले यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती. सुनावणीअंती खंडपीठाने पूर्वीच्या निवाड्याचा दाखला देत आरोपी विरोधात खटला चालवण्यास अनुमती देता येणार नाही. न्यायालयाने सदर आरोपींना खटल्यातून दोषमुक्त केल्याचे आदेशित केले.