छत्रपती संभाजीनगर : शहरात एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतर स्थानिक पोलिस ते वरिष्ठ अधिकारी, इतर ठाणेप्रमुखांना कळेपर्यंत बराच वेळ उलटून जातो; परंतु आता गुन्हा घडताच त्याचे गांभीर्य पाहून तो शहरातील एकाच कॉलवर साडेतीन हजार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळण्याची यंत्रणा शहर पोलिस दलात कार्यान्वित करण्यात आली आहे. तेरा वर्षांपासून राज्यातील पाच जिल्ह्यांत ही यंत्रणा यशस्वीपणे सुरू आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांच्या हस्ते या संदेशवहन जलद करणाऱ्या नागरी सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. नागरी सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणून शहर पोलिस दलाला सुपुर्द केली. भुमरे यांच्यासमोर त्यांनी जवळपास सात मिनिटे याचे प्रात्यक्षिक दिले. उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीणा यादव, अंमलदार चंद्रकांत दंडे, सचिन कदम, अमोल देशमुख, छाया लांडगे, माधुरी खरात यांनी यासाठी परिश्रम घेतले.
काय आहे ही संकल्पना?-१८००२७०३६०० हा या यंत्रणेचा क्रमांक आहे.-शहरात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, गंभीर घटना घडल्यास संबंधित ठाणेप्रमुख या क्रमांकाला काॅल करतील. ठाण्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी हा कॉल जाऊन एकाच वेळी प्रमुख सर्वांना घटना सांगून आदेश देऊ शकतो. घटनेच्या गांभीर्यानुसार ते कॉल इतर ठाणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या कॉलमध्ये समाविष्ट करू शकतात.-प्राथमिक स्तरावर ही यंत्रणा केवळ पोलिस विभागापुरतीच मर्यादित असून, इतरांना यात सहभागी केलेले नाही. शहरातील साडेतीन हजार कर्मचारी, अधिकाऱ्यांचे क्रमांक यात जोडल्याचे गोर्डे यांनी सांगितले.
१३ वर्षे, दीड लाख प्रकरणे हाताळलीअहमदनगर, पुणे जिल्ह्यांसह राज्यातील चार जिल्ह्यांतील साडेपाच हजार गावांमध्ये ही यंत्रणा सुरू केली आहे. यात गावाप्रमाणे मोबाइल नंबर समाविष्ट केले आहेत. १३ वर्षांत जवळपास दीड लाख कॉल हाताळले असून, साडेचार हजार प्रकरणांत गंभीर घटना थांबवण्यात यश मिळाले आहे.