औरंगाबाद : नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी-कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाचा औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील सुमारे साडेतीन कोटींच्या व्यवहाराला फटका बसला. ८७ अराजपत्रित कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी झाले होते. तिन्ही जिल्ह्यांतील २५ हून अधिक कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभरात एकाही मालमत्तेची रजिस्ट्री झाली नाही.
औरंगाबाद जिल्ह्यात ३५, जालना २५ तर बीड जिल्ह्यात २७ असे ८७ अराजपत्रित कर्मचारी संपात सहभागी झाले होते. इतर ८ कर्मचारी रजेवर, निलंबित, प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे ते संपात नव्हते. औरंगाबाद जिल्ह्यात १३ मुद्रांक नोंदणी कार्यालये आहेत. बीड आणि जालना जिल्ह्यात सुमारे १२ च्या आसपास कार्यालये आहेत. या कार्यालयातून सर्व प्रकारच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंद घेतली जाते. संपामुळे दस्त नोंदणीच्या व्यवहारावर परिणाम झाला. असे नोंदणी उपमहानिरीक्षक सोहम वायाळ यांनी सांगितले. जिल्हा मुद्रांक अधिकारी दीपक सोनवणे यांनी सांगितले, जिल्ह्यातील ३० च्या आसपास कर्मचारी संपात आहेत. संपामुळे व्यवहारावर परिणाम झाला.
नागरिकांना जावे लागले परत
बेमुदत संपाची ज्या नागरिकांना माहिती होती, ते कार्यालयाकडे फिरकले नाहीत. ज्यांना संपाची माहिती नव्हती, ते नागरिक मुद्रांक नोंदणी कार्यालयात आले होते. संप सुरू असल्याचे कळाल्यानंतर त्यांना परत जावे लागले. दुपारनंतर कार्यालय आवारात शुकशुकाट होता.
या मागण्यांसाठी संप
अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश लोखंडे, सचिव ए. के. तुपे यांनी सांगितले, की नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या त्वरित करा, नवीन सेवा नियम लागू करू नयेत, रिक्त पदे भरावीत, ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करा, आदी मागण्यांसाठी संप पुकारला आहे. कनिष्ठ लिपिक ७, पदोन्नतीची ७ पदे रिक्त आहेत. इतरही रिक्त पदांची संख्या मोठी असल्याचे लोखंडे यांनी सांगितले.