औरंगाबाद : कपडे घेण्यासाठी जाणाऱ्या तरुणाला गावठी कट्ट्याने कपाळावर मारून आणि धमकावून त्याच्या खिशातील रोख ९ हजार रुपये लुटणाऱ्या तिघांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि लुटलेल्या रकमेतील एक हजार रुपये जप्त केले. ही घटना १३ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पुंडलिकनगर परिसरात घडली.
भरत ऊर्फ भुऱ्या दादाराव वाघ, कुणाल ऊर्फ हॅण्डसम प्रदीप सोनकांबळे आणि शेख शफिक ऊर्फ शप्या शेख मुसा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, हुसेन कॉलनी येथील संतोष रामदास कांबळे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १३ जून रोजी ते कपडे खरेदी करण्यासाठी घरी जात होते. पुंडलिकनगर रस्त्यावर आरोपींनी त्यांना अडविले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. भरतने त्याच्या कमरेचा गावठी कट्टा काढून संतोष यांच्या कपाळावर मारला. यानंतर कुणाल आणि शप्याने त्यांना खाली पाडून धमकावले. यावेळी भरतने गावठी कट्टा संतोष यांच्या गळ्याला लावून जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोख नऊ हजार रुपये हिसकावून घेतले. या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले.
या घटनेत जखमी झालेल्या संतोष यांनी नातेवाईकांना बोलावून घेत खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. मलमपट्टी करून घेतल्यानंतर त्यांनी पुंडलिकनगर ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, रवी जाधव, विलास डोईफोडे, जालिंदर मांटे आणि कोमल तारे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा ते हुसेन कॉलनीत लपून बसल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना हुसेन कॉलनीत जाऊन बेड्या ठोक ल्या. त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि लुटलेल्या रकमेतील एक हजार रुपये हस्तगत केले.