औरंगाबाद : बारापुल्ला गेटजवळील खाम नदीत शेख माजीद या गुन्हेगाराचा खून करणाऱ्या तीन आरोपींना छावणी पोलिसांनी रविवारी अटक केली. यात एक आरोपी अल्पवयीन आहे.
अरबाज वाहेद खान (१९, रा. कोहिनूर कॉलनी), फळ विक्रेता मोहमद मुस्तफा उर्फ परवेज अब्दुल समद (२०, रा. कोतवालपुरा) अशी आरोपींची नावे असून, तिसरा आरोपी अल्पवयीन आहे.
हे तिघेजण शुक्रवारी रात्री कोतवालपुरा भागात रिक्षात बसून मोबाईलवर गेम खेळत होते. तेव्हा पहाटे तीन- साडेतीनच्या सुमारास नशेत तर्रर्र होऊन शेख माजीद हा तिथे गेला व मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या तरुणांच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी करू लागला. लवकर पैसे देत नसल्यामुळे माजीदने त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. राग अनावर झाल्यामुळे त्या तिघांनी त्याला गोड बोलून खामनदीजवळ नेले व त्याला बेदम चोप दिला. तेव्हा माजीद त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी पळत सुटला व पाय घसरून तो खाम नदीत कोसळला. त्याला पकडण्याच्या नादात त्याच्या अंगातील शर्ट फाटून आरोपींच्या हातात आला. त्यानंतर कायमची कटकट संपविण्याच्या हेतूने यातील एकाने त्याच्या डोक्यात दगड मारला. दगडाचा प्रहार लागताच शेख माजीद हा जागीच निपचीत पडला, अशी कबुली मारेकऱ्यांनी पोलीस तपासात दिली.
छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तत्पूर्वी, ही घटना डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेल्या अल्पवयीन आरोपीने हा प्रकार त्याच्या नातेवाईकांना सांगितला. त्यामुळे हे बिंग फुटले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून आज पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी कोहिनूर कॉलनीतील अरबाज वाहेद खान (१९) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कोतवालपुरा येथील साथीदार मोहमद मुस्तफा उर्फ परवेज अब्दुल समद (२०) आणि एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून दगड आणि मयताचे कपडे जप्त केले. मयत शेख माजीद ऊर्फ मुर्गी हा नरभक्षक बबल्याचा साथीदार असून, रिक्षाचालक मजास याच्या खून प्रकरणातील आरोपी होता. नुकताच तो जामीनावर सुटला होता.