विजय चोरडिया । लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : ग्राहकांच्या मीटरवर प्रत्यक्षात असलेल्या रीडिंगनुसार बिले देण्याऐवजी कमी रीडिंगची बिले देण्यात आली़ महावितरणच्या पडताळणीत मात्र शहरातील तब्बल ६ हजार ८०० ग्राहकांना ३ कोटी ४१ लाख रुपयांची अतिरिक्त बिले देण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शहरामध्ये मागील महिन्यात हा प्रकार उघडकीस आला. शहरामध्ये महावितरणचे ६ हजार ८०० ग्राहक आहेत़ या ग्राहकांना मागील काही वर्षांपासून खाजगी एजन्सीद्वारे बिले पुरविण्यात येतात़ ही एजन्सी ग्राहकांच्या मीटरचे फोटो घेऊन महावितरणला सादर करते़ बिले सादर करीत असताना शहरातील अनेक ग्राहकांना नियमित बिलापेक्षा कमी रकमेची बिले देण्यात आली़ यामुळे ग्राहकांनाही काही काळ समाधान वाटले़ मागील महिन्यात ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी व महावितरण अधिकाऱ्यांना एकूण विजेचा वापर व मिळणारी देयके यात तफावत आढळल्याने विशेष पथकाद्वारे शहराची तपासणी केली असता, धक्कादायक प्रकार समोर आला़ ग्राहकांच्या मीटरमध्ये बिलावर असणाऱ्या रीडिंगपेक्षा १ हजार ते १० हजार युनिट जास्तीची रीडिंग दिसून आली़ परिणामी शहरामध्ये १८ लाख ३३ हजार युनिट अतिरिक्त निघाले़ ज्याचा भुर्दंड महावितरणला बसला़ यातून मार्ग काढण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त बिले वाटली़ त्यामुळे आता तब्बल ३ कोटी ४१ लाखांची बिले ग्राहकांच्या माथी मारण्यात आली असून ती आता ग्राहकांनाच भरावी लागणार आहेत़
तीन कोटींची बिले वीज ग्राहकांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:24 AM