औरंगाबाद : वाहतूक नियमन करता करता शहर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले. या चालकांकडून ३ कोटी २४ लाख ६७ हजार ४७२ रुपये दंड वसूल करण्यात आला.
पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतूक नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. या वाहतूक विभागांतर्गत शहर शाखा एक आणि शाखा दोन सोबतच, सिडको, छावणी आणि वाळूज, अशा एकूण पाच शाखेत ३५० पोलीस कार्यरत आहे. वाहतूक नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत शहर पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ९७ हजार ४७२ बेशिस्त वाहनचालकांना पकडले.
परवान्याचे उल्लंघन करणे, राँग पार्किंग करणे, स्टॅण्ड सोडून वाहन उभे करणे, रिक्षात चालकाशेजारी प्रवासी बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहने चालविणे. विनासीटबेल्ट कार चालविणे, ट्रीपल सीट दुचाकी पळविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, विनानोंदणी वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनांत बदल करणे, फिटनेस प्रमाणपत्र नसलेले वाहन चालविणे, वाहनांवर फॅन्सी आणि अस्पष्ट नंबर टाकणे, विनागणवेश टॅक्सी चालविणे, यासह मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
‘नो एंट्री’त पकडले सर्वाधिक वाहनचालकजड वाहनांना शहरात प्रवेश मनाई आहे. याशिवाय बायपासवरील अपघात टाळण्यासाठी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.या नियमांचे उल्लंघन करताना सर्वाधिक २९ हजार ७५५ वाहनचालकांना पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून ६६ लाख ६१ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. भरधाव वेगाने वाहने पळविणाऱ्या १७५ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले.
अकराशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाईदारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, ही बाब लक्षात घेऊन वर्षभरात अकराशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एच. एस. भापकर यांनी दिली. ते म्हणाले की, मद्यपी वाहनचालकांकडून २५ लाख २९ हजार ९०० रुपये दंड भरून घेण्यात आला.
४ हजार ८३४ दुचाकीस्वारांना पकडले विनाहेल्मेट४ हजार ८३४ जणांना विनाहेल्मेट दुचाकी चालविताना तर ९ हजार ४६१ जणांना सीटबेल्टविना कार चालविताना पकडून दंड वसूल केला.