लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भाजपच्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने शुक्रवार, ११ मेपासून तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाचाही पूर्णपणे फज्जा उडाला आहे. मनपा प्रशासनाकडे कोणतेच नियोजन नसल्याने मागील तीन दिवसांमध्ये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. महापालिकेने निश्चित केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार एकाही वॉर्डाला पाणी मिळाले नाही. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी सकाळी ९.३० वाजता पाणी प्रश्नावर तातडीची बैठक आयोजित केली आहे.भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापालिकेत ९ मे रोजी रात्री झोपा आंदोलन केले. त्यानंतर प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांनी संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. पाणीपुरवठा विभागानेही ११३ वॉर्डांच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक तयार केले. प्रत्येक पाण्याच्या टाकीवर हे वेळापत्रक चिकटवण्यात आले. शुक्रवार, ११ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली. रविवार, १३ मे रोजी तीन दिवस संपले तरी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता. दंगलग्रस्त राजाबाजार परिसरालाही तब्बल १४ तास उशिराने पाणी देण्यात आले. सिडको एन-५, एन-७, शहागंज, ज्युबिलीपार्क, दिल्लीगेट, पुंडलिकनगर आदी पाण्याच्या टाक्यांवर टप्पे विस्कळीत झाले आहेत. मनपा तीन दिवसांआड पाणी देणार म्हटल्यावर अनेक वॉर्डांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रयोगही फसला. मागील तीन दिवसांमध्ये पाण्याच्या तक्रारी पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाल्या. भाजप नगरसेवकांच्या समाधानासाठी मनपा प्रशासनाने तीन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयोग राबविला असला, तरी तो अपयशी ठरला आहे. शहरात दररोज १३५ एमएलडी पाणी येते. तीन दिवसांत ४०५ एमएलडी पाणी मनपाला मिळते. शहराची गरज २२२ एमएलडी पाण्याची आहे. दुप्पट पाणी असूनही मनपा शहराची तहान भागवू शकत नाही. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी महापौरांनी सोमवारी पुन्हा बैठक आयोजित केली आहे.
तीन दिवसांआड पाणी; प्रयोग फेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 1:26 AM