वाळूज महानगर: सिडको वाळूज महानगरात चोरट्यांनी महिनाभरात तब्बल ५० ते ६० पाणी मोटारी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरफोडी, वाहनचोरीच्या घटना घडत असतानाच आता विद्युत मोटारी चोरी होत असल्याने सिडकोतील रहिवाशांची झोप उडाली आहे.
सिडको वाळूज महानगरात नागरी वसाहतीत मोठ्या संख्येने वाढ झाली असून बहुतांशी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या आहेत. सिडकोत पाणी गळतीचे प्रमाण जास्तीचे असल्याने अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांनी विद्युत मोटारी बसविल्या आहेत. परंतु काही दिवसांपासून नागरिकांच्या मोटारी चोरीला जात आहेत.
महानगर १ मधील ग्रोथ सेंटर, साई अपार्टमेंट, आयजी निवास, मनजित प्राईड तसेच महावितरण उपकेंद्रा समोरील परिसर या भागात मोटार चोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे. गत महिनाभरापासून ५० ते ६० जणांच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत.
तीन दिवसापूर्वी संदीप शिंदे यांचा सुरक्षा रक्षक मनोहर म्हस्के याला मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास मोटार चोरताना दोन तरुण दिसून आले होते. म्हस्के याने सोसायटीतील नागरिकांना बोलावताच चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. मोटार चोरीच्या घटनाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.