मंठा : तालुक्यातील ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवक निलंबनाचे प्रकरण गाजत असतानाच गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांनी तळणी, देवगाव खवणे, ढोकसाळ, या ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली असता या ठिकाणी कार्यरत असलेले तीनही ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.मंठा तालुक्यात अनेक गावांत ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हजर रहात नसल्याने विकास कामांवर विपरित परिणाम होत असल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्याकडे आल्याने त्यांनी सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना आपल्या मुख्यालयी दररोज सकाळी ९ ते २ पर्यंत थांबण्याचे आदेश दिले होते. आपण न थांबल्यास नियमानुसार कार्यवाही करणार असल्याचा दम देऊनही देवगाव खवणे येथील ग्रामविकास अधिकारी एस. आर. आटोळे, ढोकसाळचे वानखेडे आणि तळणीचे डी.जे. सरोदे गटविकास अधिकाऱ्यांनी ठरलेल्या वेळी भेट दिली तेव्हा गैरहजर असल्याचे आढळून आले. म्हणून त्यांचे २५ एप्रिल रोजीचे एक दिवसाचे वेतन कपात करून आता मात्र, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.जे ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामसेवक यांच्याकडे अतिरिक्त गावे आहेत. त्यांना त्या गावासाठी हजर राहण्यासाठी वार नेमून दिले असल्याचे गटविकास अधिकारी तांगडे यांनी सांगितले.
तीन ग्रामसेवकांची वेतन कपात...!
By admin | Published: May 03, 2017 12:21 AM